आरेतली झाडं वाचवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

 Mumbai
आरेतली झाडं वाचवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई - आरेतल्या मेट्रोसाठीच्या कारशेडमुळे अनेक झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे मुंबईकर विरोध करताना दिसत आहेत. पण यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "मेट्रो-3 प्रकल्पासह अन्य मेट्रो प्रकल्पात अधिकाधिक झाडे कशी वाचवता येतील, झाडांची कत्तल न करता मेट्रो कशी मार्गी लावता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

सेव्ह ट्री ग्रुपने मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी एमएमआरसीलाही यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश देत झाडांच्या कत्तली रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेत.

मेट्रो-3 साठी 5 हजार 12 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. मेट्रो-2, मेट्रो-7 आणि मेट्रो-4 मध्ये हजारो झाडांचे बळी जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन मुंबईकरांचा श्वास गुदमरणार आहे. या अनुषंगाने मेट्रो-3 साठी झाडांच्या कत्तलीविरोधात सेव्ह ट्रीने न्यायालयात स्थगिती मिळवण्यात यश मिळवले आहे. मात्र हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, झाडांची कत्तल न करता मेट्रो मार्गी लावावी यासाठी सेव्ह ट्री प्रयत्नशील आहे. त्यामुळेच मंगळवारी सेव्ही ट्रीच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपण मेट्रो किंवा विकास विरोधी नसल्याचे स्पष्ट केले.

Loading Comments