Advertisement

वॉटरफॉलमधून निघाला ६൦൦ किलो कचरा!


वॉटरफॉलमधून निघाला ६൦൦ किलो कचरा!
SHARES

पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती करायला कुणाला नाही आवडत? खास करून मुंबईजवळ असणाऱ्या वॉटरफॉलला तर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. सर्वत्र बहरलेली हिरवळ आणि मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात मजा, मस्ती करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण नातलगांसोबत निसर्गरम्य स्थळांना भेट देतात. पण मजा, मस्ती करताना आपल्याला निसर्गाचा विसर पडतो. 

जंगल किंवा वॉटरफॉल परिसरात जाणारे पर्यटक तिकडे अक्षरश: उकिरडा करतात. पेपर प्लेट्स, प्लॅस्टिक कचरा आणि दारूच्या बाटल्या याचा नुसता खच पडलेला असतो. यामुळे निसर्गाला तर हानी होतेच, पण त्याशिवाय आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांना याचा भुर्दंड भरावा लागतो. पण ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी 'एन्व्हायर्नमेंट लाईफ' या संस्थेने उचलली आहे. गेल्या वर्षभरापासून या संस्थेने 'वॉटरफॉल क्लिनअप ड्राइव्ह' ही मोहीम राबवली आहे. आत्तापर्यंत 'एन्व्हायर्नमेंट लाईफ'ने नऊ ठिकाणी वॉटरफॉल क्लिनअप मोहीम राबवली आहे.



1 ऑक्टोबर म्हणजेच रविवारी 'एन्व्हायर्नमेंट लाईफ'च्या सदस्यांनी नेरळमधल्या आनंदवाडी वॉटरफॉल परिसरात क्लिनअप मोहीम राबवली. आठ ते साठ वयोगटातल्या 45 स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी तब्बल 600 किलो कचरा गोळा केला. विशेष म्हणजे यातल 90 टक्के दारूच्या बाटल्या होत्या.

2 ऑक्टोबर 2016 साली आम्ही नेरळ मधल्या आनंदवाडी वॉटरफॉल परिसरातूनच क्लिनअप ड्राइव्ह मोहिमेचा शुभारंभ केला होता. 'एन्व्हायर्नमेंट लाईफ' या संस्थेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही पुन्हा आनंदवाडी वॉटरफॉल परिसरात क्लिनअप मोहीम राबवली. विशेष म्हणजे यावर्षी गावकऱ्यांनी मोहिमेत स्वत:हून सहभाग घेतला.

धर्मेश बरई, मुख्य समन्वयक, एन्व्हायर्नमेंट लाइफ



'एन्व्हायर्नमेंट लाईफ'ने सुरू केलेल्या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आत्तापर्यंत जवळपास पाच टन कचरा मोहिमेत गोळा करण्यात आला आहे. मुंबईजवळ असलेले टुरिझम स्पॉट्स(पर्यटन स्थळे) खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉरपोरेशन(MTDC)ने याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. 

चेंजिंग रूम, टॉयलेट, कचऱ्याचे डबे आणि वैद्यकीय सुविधा एमटीडीसीकडून पुरवल्या गेल्या पाहिजेत. मात्र, फक्त प्रशासनाकडे बोट करुन चालणार नाही. या देशाचा नागरिक म्हणून आपलीसुद्धा काहीतरी जबाबदारी आहे. किती जणं आपली स्वच्छता राखण्याची जबाबदारी पार पाडतात? हा प्रश्न प्रत्येकानं स्वत:लाच विचारायला हवा.



पर्यटकांची जबाबदारी

  • निसर्गरम्य ठिकाणी कचरा टाकू नये
  • आसपास कचऱ्याचे डबे नसतील, तर कचरा सोबतच ठेवा आणि घरच्या कचऱ्याच्या डब्यात टाका
  • निसर्गरम्य स्थळी दारूचे सेवन करू नये
  • प्लॅस्टिक आणि दारूच्या बाटल्या, पेपर प्लेट्स आणि इतर कचरा वॉटरफॉल परिसरात टाकू नये
  • इतर कुणी कचरा टाकत असेल, तर त्याला समजावण्याचा प्रयत्न करावा


एकीकडे 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त राजकारणी साफसफाईचा आव आणतात, तर दुसरीकडे 'एन्व्हायर्नमेंट लाईफ', आफरोज शहा आणि यांच्यासारखे अनेक पर्यावरण रक्षणाचा खरा विडा उचलून कामाला लागले आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनीच जागं होण्याची आवश्यकता आहे. नाहीतर निसर्गाने दिलेलं वरदान आपण गमावून बसू आणि याला जबाबदारही आपणच असू.



हेही वाचा -

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे वरळी हिलचे बाबुजी!

महापालिकाही उभारणार आयुर्वेदिक निसर्ग उद्यान



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा