दलदलीत झाडांचे पुनर्रोपन, झाडं जगणार कशी?


SHARE

मुंबई - मेट्रो-3 साठी झाडे तोडावीच लागतील असे म्हणत मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशनने तोडलेल्या झाडांच्या बदल्यात मोठ्या संख्येने झाडांचे पुनर्रोपन करणार असल्याचे जाहीर केले आहे. पण वडाळ्यातील ज्या ठिकाणी एमएमआरसीने झाडांचे पुनर्रोपन करण्याचे ठरवले आहे ती जागा दलदलीची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा दलदलीत झाडे जगणार कशी असा सवाल झाडांच्या कत्तलीच्या विरोधातील याचिकाकर्त्यांनी केला आहे.

आरे, कलिना आणि वडाळा अशा तीन ठिकाणी झाडांचे पुनर्रोपन करण्यात येणार आहे. त्यानुसार कुलाबा आणि कफ परेडमधील तोडण्यात येणाऱ्या 507 झाडांचे पुनर्रोपन वडाळ्यातील 4.2 हेक्टरच्या दरगाह प्लॉटवर करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने एमएमआरसीला परवानगीही दिली आहे. पण नुकतीच याचिका कर्त्यांनी जागेची पाहणी केली असता ही जागा दलदलीची असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

जिथे तिवरं जगू शकत नाहीत तिथे मोठाली झाडे कशी जगणार? असा सवाल यानिमित्ताने आता उपस्थित होत आहे. एमएमआरसीचे अधिकारी मात्र जागेचा योग्य प्रकारे विकास करत झाडांचे पुनर्रोपन करण्यात येणार असल्याचे सांगत आहेत. मात्र नियमाप्रमाणे झाडे तोडल्यानंतर 30 दिवसांच्या आत झाडांचे पुनर्रोपन करणे बंधनकारक आहे. असे असताना कफ परेडमध्ये फेब्रुवारीमध्ये 100 झाडे तोडण्यात आली असून, या झाडांचे अद्याप पुनर्रोपन झालेले नाही. त्यामुळे हा सर्व एमएमआरसीचा गोलमाल असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. कारण दलदलीच्या जागेचा विकास करणार कधी आणि झाडांचे पुनर्रोपन करणार कधी असा प्रश्न आहे. तर पालिकेने जागा न पाहताच परवानगी दिली कशी? असा सवाल करत पालिका आणि एमएमआरसीला या विषयावरून घेरण्याची तयारी आता याचिकाकर्ते आणि 'सेव्ह ट्री' संस्थेने केली आहे. दरम्यान मेट्रो-3 मध्ये दररोज नवनवे खुलासे समोर येत असल्याने मेट्रो-3च्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.

दरम्यान, पुर्नोपित केलेली झाडं जगण्याची शक्यता केवळ 5 टक्के असते आणि हा माझा 15 वर्षांचा अभ्यास आहे. आता बदलत्या परिस्थितीनुसार हे प्रमाण आणखी कमी झालं आहे. दलदलीत झाडं जगण्याची शक्यता अत्यल्प असल्याची प्रतिक्रिया पर्यावरण तज्ज्ञ गिरीष राऊत यांनी दिली.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या