Advertisement

महाघोटाळा! धोकादायक झाडं आणि फांद्या कापण्यासाठी १५० कोटींचा खर्च!


महाघोटाळा! धोकादायक झाडं आणि फांद्या कापण्यासाठी १५० कोटींचा खर्च!
SHARES

मुंबई महानगरपालिकेचं उद्यान विभाग खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून मुंबईतील धोकादायक झाडं आणि झाडांच्या फांद्या कापण्याचं काम करवून घेतं. या कामासाठी महिन्याला साधारणत किती खर्च येतो, हे सांगितलं तर अनेकांचे डोळे नक्कीच विस्फारतील. या कामांसाठी लाखांच्या घरात नव्हे तर कोट्यवधींचा खर्च होत अाहे. गेल्या तीन वर्षात उद्यान विभागानं यासाठी तब्बल १५० कोटी रूपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हणजेच उद्यान विभाग यावर महिन्याला तब्बल चार कोटी रुपये खर्च करतं.


पर्यावरणप्रेमींची पालिकेवर टीका

कामाचं स्वरूप आणि होत असलेला खर्च यातील तफावत फारच मोठी असल्याचं म्हणत पर्यावरणप्रेमी आणि 'सेव्ह ट्री'च्या सदस्यांनी हा एक महाघोटाळा असल्याचा आरोप करत आता यावरून पालिकेवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात हा विषय गंभीर होण्याची शक्यता आहे.

माहिती अधिकारात उघड

मुंबईतील झाडांच्या कत्तलीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेले माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी ही धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. पालिकेच्या उद्यान विभागानं धोकादायक झाडं आणि झाडांच्या फांद्या कापणं, झाडांच्या भोवताली कट्टा बांधत त्यांची देखभाल करणं या कामासाठी खासगी कंत्राटदाराशी तीन वर्षांपूर्वी करार केला होता. एप्रिल २०१६ ते मार्च २०१९ या कालावधीत २४ विभागातील धोकादायक झाडं आणि झाडांच्या फांद्या कापत, झाडांभोवती कट्टे बांधण्यासाठी कंत्राटदाराने तीन वर्षात १५० कोटी म्हणजेच महिन्याला 4 कोटी रुपये घेतल्याची माहिती बाथेना यांनी दिली आहे.


अाकडेवारी चक्रावणारी

मुळात किती झाडं कापली, किती झाडांच्या फांद्या कापल्या, किती झाडांभोवती कट्टे बांधले, हे कागदपत्रांमध्ये समाविष्ट नाही. पण प्रत्येक विभागात तीन वर्षात या कामांसाठी किती खर्च केला, याची आकडेवारी मात्र आहे आणि ही आकडेवारी चक्रावणारी असल्याचंही बाथेना यांनी स्पष्ट केलं आहे. या कामाचं स्वरूप लक्षात घेता हा खर्च महिन्याला जास्तीत जास्त एक कोटीपर्यंत असू शकतो, असं म्हणत आता पर्यावरणप्रेमींनी हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. तर ही बाब लवकरच झाडांच्या कत्तलीविरोधातील याचिकेदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचंही बाथेना यांनी सांगितलं आहे.


झाडांच्या लाकडांचीही विक्री

करारानुसार धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्याएेवजी हे खासगी कंत्राटदार झाडांची कत्तल करत झाडांचं लाकूड विकत असल्याचा आरोपही आता यानिमित्तानं पर्यावरणप्रेमी करत आहेत. कोट्यवधी रुपये घेऊन झाडं वाचवण्याएेवजी झाडांना मारून टाकले जात अाहे. त्याबरोबर कापलेल्या झाडाचे लाकूड विकण्याचा एका धंदाच या कंत्राटदारांनी चालवल्याचा आरोप 'वनशक्ति'चे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीचीही मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.


हेही वाचा -

पर्यावरणप्रेमींचा दणका, दादरमधील झाडांच्या छाटणीचं काम बंद

मुंबईतल्या तरुणांनी केलं झाडांना वेदनामुक्त



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा