Advertisement

पर्यावरणप्रेमींचा दणका, दादरमधील झाडांच्या छाटणीचं काम बंद


पर्यावरणप्रेमींचा दणका, दादरमधील झाडांच्या छाटणीचं काम बंद
SHARES

दादरमधील डी. एल. वैद्य मार्गावरील ५१ झाडांच्या मुळासकट छाटणीचं काम मुंबई महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं अखेर थांबवलं आहे. झाडांची मुळासकट छाटणी करणं हे बेकायदेशीर असल्याचं पटवून देत काही पर्यावरणप्रेमींनी या कामाला विरोध केला होता. गुरुवारी सकाळी झाडांची छाटणी सुरू असलेल्या डी. एल. वैद्य मार्गावर धाव घेत काही पर्यावरणप्रेमींनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. पर्यावरणप्रेमींच्या या दणक्यानंतर शुक्रवारी झाडांच्या छाटणीचं काम पूर्णत: बंद असून वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी इकडे फिरकले नसल्याची माहिती पर्यावरणप्रेमी कुणाल बिरवडकर यांनी दिली आहे.


झाड कोसळून चार जखमी

९ जूनला झालेल्या पावसामुळे डी. एल. वैद्य रोडवरील एका झाडाच्या अाडोशाला उभे राहिल्यानंतर हे झाड उन्मळून पडल्यानंतर चार जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर वृक्ष प्राधिकरणानं धोकादायक झाडांची १८ सेंमीपर्यंत छाटणी करण्याएेवजी थेट मुळासकटच झाडांची छाटणी करण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचं म्हणजे केवळ डी. एल. वैद्य मार्गावरीलच नव्हे तर दादर पश्चिम परिसरातील काही निवडक रस्त्यांवरील सर्वच्या सर्व झाडांची मुळासकट छाटणी करण्याचा निर्णय घेतला आहे.


पर्यावरणप्रेमींचा विरोध

या निर्णयानुसार मंगळवारपासून डी. एल. वैद्य मार्गावरील झाडांची मुळासकट छाटणी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामांतर्गत येथील १० हून अधिक झाडं मुळासकट कापण्यात आली आहेत. मात्र झाडांची मुळासकट छाटणी करणं हा प्रकार म्हणजे झाडांचा बळी घेण्यासारखं असून हा गुन्हा असल्याचं म्हणत पर्यावरणप्रेमींना या कामाला जोरदार विरोध केला.


काम बंद पाडण्याचा प्रयत्न

गुरुवारी सकाळी थेट कामाच्या ठिकाणी धाव घेत पर्यावरणप्रेमींनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण वृक्ष प्राधिकरणानं काम बंद करण्यास विरोध केला नि यावरून चांगलाच वाद रंगला. शेवटी हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेलं. बेकायदेशीररित्या झाडांची मुळासकट छाटणी करत झाडांचा बळी घेतला जात असल्याबद्दलची तक्रार कुणाल बिरवडकर आणि श्रद्धा बिरवडकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात केली.


वृक्ष प्राधिकरण नमलं

या तक्रारीनंतर अखेर शुक्रवारी वृक्ष प्राधिकरणानं पूर्णत: काम बंद केल्याची माहिती बिरवडकर यांनी दिली. वृक्ष प्राधिकरणाचे कनिष्ठ वृक्ष अधिकारी अमित करंदीकर यांनी शुक्रवारी काम बंद असल्याच्या वृत्ताला मुंबई लाइव्हशी बोलताना दुजोरा दिला. तर सोमवारपासून पुन्हा काम सुरू होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


नवीन झाडं लावली

वृक्ष प्राधिकरणानं काम बंद केल्याबद्दल कुणाल बिरवडकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तर सोमवारी वा त्यानंतर कधीही काम पुन्हा सुरू केल्यास, काम पुन्हा बंद पाडण्याचाही इशारा दिला आहे. दरम्यान, डी. एल. वैद्य रोडवरील ज्या ठिकाणच्या जुन्या १५० वर्षांपूर्वीच्या झाडांचा बळी वृक्ष प्राधिकरणाकडून घेण्यात आला आहे, त्या ठिकाणी रहिवाशांनी पुढं येत नवीन झाडं लावली आहेत. रहिवाशांच्या या भूमिकेचं कौतुक आता पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.


हेही वाचा -

दादरमधील 'त्या' रोडवरील सर्व झाडांची छाटणी, फक्त खोडच ठेवणार!

झाडांच्या कत्तलीवरून दादरमध्ये पर्यावरणवादी अन् पालिकेत जुंपली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा