'एक तर मेट्रो होईल किंवा झाडं वाचतील'

 Mumbai
'एक तर मेट्रो होईल किंवा झाडं वाचतील'

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो-3 प्रकल्पात अधिकाधिक झाडे कशी वाचवता येतील याचा प्रयत्न निश्चितपणे सरकार आणि एमएमआरसीकडून केला जाईल, असे आश्वासन मंगळवारी दिले होते. या आश्वासनाला 24 तास उलटत नाहीत तोच एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी मात्र झांडाची कत्तल रोखता येणारच नाही असे रेटून सांगितले आहे. झाडं वाचवायची असतील तर मेट्रो रद्द करावी लागेल, असे म्हणत झाडं किंवा मेट्रो असाच पर्याय असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सेव्ह ट्री सदस्यांशी चर्चा करण्याचे आदेश एमएमआरसीला दिले होते. त्यानुसार बुधवारी एमएमआरसीच्या कार्यालयात सेव्ही ट्रीच्या सदस्यांची आणि एमएमआरसीच्या सदस्यांची चर्चा झाली. मात्र एमएमआरसी झाडांची कत्तल रोखताच येत नसल्यावर आणि सेव्ह ट्री ग्रुप झाडे वाचवत मेट्रो मार्गी लावता येईल यावर ठाम राहिल्याने ही चर्चा अखेर निष्फळ ठरली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवल्याने आम्हाला आशा होती की, आजच्या बैठकीत एमएमआरसी झाडे वाचवण्याच्या दृष्टीने काही तरी योग्य निर्णय घेईल. पण तसे झाले नाही. एमएमआरसी आपल्या आडमुठ्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आता त्यांनी हीच भूमिका न्यायालयात मांडावी, यावर न्यायालय काय निर्णय घेतो ते बघू, असे म्हणत सेव्ह ट्रीचे सदस्य झोरू बाथेना यांनी एमएमआरसीच्या भूमिकेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तर एमएमआरसी आणि सेव्ह ट्रीमधील वाद असाच सुरू राहणार हेही यावरून स्पष्ट झाले आहे.

Loading Comments