Advertisement

मेट्रोसाठी बोलावला 34 लाखांचा ट्री सर्जन


मेट्रोसाठी बोलावला 34 लाखांचा ट्री सर्जन
SHARES

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 प्रकल्प आरे कारशेड, झाडांची कत्तल, झाडांचे पुनर्रोपण आणि विविध नियमांचे उल्लंघन अशा विविध कारणांनी वादात अडकला आहे. त्यात आता आणखी एका कारणाची भर पडणार आहे. मेट्रो-3 च्या प्रकल्पाचा खर्च कसा फुगवला जात आहे याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. झाडांच्या पुनर्रोपणासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने थेट सिंगापूरवरून ट्री सर्जन (ट्री कन्स्लटंट) मागवला आहे. या ट्री सर्जनवर केवळ सहा महिन्यांसाठी लाखोंचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली आहे.

सिंगापुरवरून येणाऱ्या या ट्री सर्जनला दर महिन्याला 22 लाख रुपये इतका पगार देण्यात येत आहे. तर सहा महिन्यांसाठी त्याच्या रहाण्या, खाण्या-पिण्यावर 10 लाख 80 हजार इतका खर्च करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या येण्या-जाण्याच्या तिकिटावर 1 लाख 20 हजारांची उधळपट्टी केली जात आहे. एमएमआरसीच्या या उधळपट्टीवर वनशक्ती आणि सेव्ह ट्रीने सडकून टीका केली आहे. झाडांची कत्तल सुरू झालेली असतानाही 22 लाख पगार घेणारा ट्री सर्जन कुठे आहे? तो नेमकं काय काम करतो? असा सवाल सेव्ह ट्रीचे झोरू बाथेना यांनी एमएमआरसीला केला आहे.

ट्री सर्जनप्रमाणे आणखी किती गोष्टींवर एमएमआरसी उधळपट्टी करत प्रकल्पाचा खर्च वाढवत असेल हा मोठा प्रश्न असल्याचे म्हणत माणसांवर नाही तर झाडांवर पैसा खर्च करावा असा टोला स्टॅलिन दयानंदने एमएमआरसीला मारला आहे. तर मुंबईत वा देशात ट्री सर्जन सापडला नाही का? सिंगापुरमधल्या ट्री सर्जनला भारतातील झाडांची माहिती असेल का? असाही सवाल उपस्थितीत केला आहे.

दरम्यान, याविषयी एमएमआरसीचे कार्यकारी संचालक (नियोजन) आर. रमण्णा यांनी सिंगापुरच्या ट्री सर्जनची नेमणूक करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर इतक्या मोठ्या संख्येने झाडांची कत्तल आणि पुनर्रोपण केले जात असताना आणि पुनर्रोपण योग्य प्रकारे करणे आमची जबाबदारी असताना चांगला ट्री सर्जन नियुक्त करणे गरजेचेच होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या ट्री सर्जनबाबत अधिक माहिती देणे त्यांनी टाळले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा