जगण्याचं बळ देणारा 'कॉन्फिडन्स वॉक'

वरळी - वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे दिव्यज फाऊंडेशनतर्फे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांसाठी कॉन्फिड्न्स वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. अॅसिड हल्ला झाल्यानंतर पीडित तरूण- तरुणी विद्रुप होतातच पण, त्याचवेळी त्यांचे मानसिक खच्चीकरणही होते. म्हणूनच अमृता फडणवीस यांचे दिव्यज फाऊंडेशन आणि राज्य महिला आयोगाच्या वतीने अशा पीडितांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी कॉन्फिडन्स वॉक ही संकल्पना राबवण्यात आली.

यामध्ये अनेक सेलिब्रेटींनी पीडितांसोबत रॅम्पवॉक केला. अॅसिड हल्ल्यानंतर पीडितांनी गमावलेला आत्मविश्वास त्यांना परत मिळावा हाच या कॉन्फिडन्स वॉक मागचा उद्देश. या वेळी आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलला पाहीजे असे आवाहनही पीडितांनी केले.

कार्यक्रमादरम्यान महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सक्षमा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. पीडितांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी एक माहितीपट दाखवण्यात आला. तसंच अमृता फडणवीस यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्याने उपस्थितांची मने जिंकली. दिव्यज फाऊंडेशनच्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन समाजाने या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर त्यांच्या जगण्याच्या प्रवासात नक्कीच कॉन्फिडन्स येईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने हा कॉन्फिडन्स वॉक सार्थकी लागेल.

Loading Comments