मांजरेकर बनले रॅपर!

‘मराठी बिग बॉस’चं पहिलं पर्व तूफान गाजल्यानंतर मांजरेकर आता ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वासाठी सज्ज झाले आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या प्रेक्षकांसाठी मांजरेकरांनी रॅपचीक रॅप साँग गायलं आहे.

  • मांजरेकर बनले रॅपर!
SHARE

आजचा जमाना रॅपरचा आहे. ‘गली बाॅय’मध्ये रणवीर सिंगनं साकारलेल्या रॅपरच्या पावलावर पाऊल टाकत निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकरही रॅपर बनले आहेत.


रॅप साँगचा जमाना 

मांजरेकरांनी आजवरच्या आपल्या कारकिर्दीत चतुरस्र कामगिरी बजावली आहे. सुरुवातीला दिग्दर्शनात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी अभिनय आणि सिनेनिर्मितीतही महत्त्वपूर्ण कामगिरी करत आशयघन चित्रपट दिले आहेत. याखेरीज त्यांना गायनाचीही हौस आहे. ही हौस त्यांनी यापूर्वीही काही चित्रपटांमध्ये भागवली आहे. दिग्दर्शक संजय गुप्तांच्या ‘कांटे’मध्ये मांजरेकरांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाणं गायलं होतं. याशिवाय ‘पद्मश्री लालूप्रसाद यादव’ आणि ‘रक्त’ या हिंदी चित्रपटांसोबतच त्यांनी ‘शहाणपण देगा देवा’ या मराठी चित्रपटासाठीही गायन केलं आहे. सध्याचा जमाना रॅप साँगचा असल्यानं मांजरेकरांनी आता रॅपमध्येही नशीब आजमावलं आहे.


रॅपचीक रॅप साँग

‘मराठी बिग बॉस’चं पहिलं पर्व तूफान गाजल्यानंतर मांजरेकर आता ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वासाठी सज्ज झाले आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या प्रेक्षकांसाठी मांजरेकरांनी रॅपचीक रॅप साँग गायलं आहे. ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या सीझनसाठी मांजरेकर यांनी नुकतंच स्टायलाइझ रॅप साँग शूट केलं असून, ते स्वतः गायलंही आहे. मांजरेकरांचा डॅपर लुक आणि विंटेज बीटल रेट्रो गाडीवर बसून त्यांची या रॅप साँगमधली एन्ट्री एकदम कडक आहे.


 डॅपर लुक्समध्ये

मांजरेकर या गाण्यामध्ये चार वेगवेगळ्या डॅपर लुक्समध्ये दिसणार आहेत. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी सहा वेगवेगळ्या प्रकारचे सेट तयार करण्यात आले होते. ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वासाठी बरेच प्रोमोज शूट करण्यात आले असून, प्रत्येक प्रोमोमध्ये मांजरेकरांचा एक वेगळा अंदाज पहायला मिळत आहे. मांजरेकरांच्या या वेगवेगळ्या लुक्समुळं ‘बिग बॉस’च्या घराबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. दुसऱ्या पर्वात ‘बिग बॉस’च्या घरात कोणते सेलिब्रिटी दिसणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत.हेही वाचा -

सयाजीसोबत नवोदित पूजाचा 'तांडव'

मराठीसाठी पंजाबी गुरबिंदर सिंगची उर्दू कव्वाली !
संबंधित विषय
ताज्या बातम्या