Advertisement

सयाजीसोबत नवोदित पूजाचा 'तांडव'

'तांडव' साठी दिग्दर्शक जाधव यांना एका नवोदित तरुणीची गरज होती. त्यासाठी जवळजवळ २०० मुलींच्या आॅडीशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यातून पुजाची महिला पोलिस इन्स्पेक्टर या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.

सयाजीसोबत नवोदित पूजाचा 'तांडव'
SHARES

चित्रपटसृष्टीमध्ये ठराविक अंतरानं स्त्रीप्रधान चित्रपट बनत असतात. मराठी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. मराठीत आता महिला पोलिस अधिकारी बनलेल्या नवोदित पूजानं सयाजी शिंदेसोबत केलेला 'तांडव' पाहायला मिळणार आहे.


२४ मे रोजी प्रदर्शित

२४ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं शीर्षकच 'तांडव' आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष जाधव यांनी केलं असून, बॅालिवुडपासून टॅालिवुडपर्यंत आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण करणारा अभिनेता सयाजी शिंदे या चित्रपटात पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. एक प्रामाणिक महिला पोलिस अधिकारी कठोरपणे आपलं कर्तव्य बजावताना कशा प्रकारे 'तांडव' करत अन्यायाविरोधात लढा देते त्याची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात नवोदित पूजानं मुख्य नायिका साकारली आहे.


२०० मुलींच्या आॅडीशन्स 

'तांडव' साठी दिग्दर्शक जाधव यांना एका नवोदित तरुणीची गरज होती. त्यासाठी जवळजवळ २०० मुलींच्या आॅडीशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यातून पुजाची महिला पोलिस इन्स्पेक्टर या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. पूजानंही नवोदित असूनही जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक डॅशिंग महिला पोलिस अधिकारी साकारण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. या चित्रपटासाठी पूजाला फिजिकल फिटनेस, बुलेट बाईक, लाठी, काठी आणि तलवारबाजी यांचं प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळंच या चित्रपटात तिनं साकारलेली कीर्ती मराठे पाटील ही व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होईल, असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे.


मुजोर पालकमंत्री

या चित्रपटाची संकल्पना रामेश्वर काकडे यांची आहे. हा चित्रपट मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध भाष्य करणारा असून, अन्यायाविरुद्ध मुलींना सक्षमीकरणाचे धडे देणारा आहे. प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी अगोदर जिजाऊ घडल्या पाहिजे असं भाष्य करणारा चित्रपट म्हणजे 'तांडव' असल्याचं मत निर्माते आणि लेखक सुभाष काकडे यांनी व्यक्त केलं आहे. या चित्रपटात सयाजीनं लोकांवर अन्याय करणाऱ्या, मुजोर पालकमंत्र्यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अरुण नलावडे, आशिष वारंग, स्मिता डोंगरे, अनिकेत कांझारकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.



हेही वाचा -

शेवंताच्या 'रात्रीस खेळ चाले'ची सेंच्युरी

'चेहरे' चित्रपटातील अमिताभ यांचा फर्स्ट लूक पाहिलात का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा