Advertisement

लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त चित्र प्रदर्शन


लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त चित्र प्रदर्शन
SHARES

प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान गायिका लता मंगेशकर यांच्यावर आधारित चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात 58 चित्रांचा समावेश असून 30 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपये किंमतीची चित्रे या ठिकाणी विक्रीसाठी ठेवली आहेत.



जबलपूरचे चित्रकार रामकृपाल नामदेव हे गायिका लता मंगेशकर यांचे मोठे चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी लता दिदींची अनेक चित्रे रेखाटलेली असून त्यापैकी 41 चित्रे या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

या चित्र प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लता मंगेशकर यांच्या आयुष्यातल्या विशेष क्षणांपैकी काही क्षण या ठिकाणी चित्रातून रेखाटण्यात आले आहेत. यामध्ये 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणे गात असलेल्या लता मंगेशकर आणि सोबत पंडित नेहरू, पंडित जसराज आणि लता दीदी, बाळासाहेब ठाकरे, महेश राठोड, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, समाजसेवक अण्णा हजारे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचे लता मंगेशकर यांचे फोटो आणि ऑइल पेंटिंग तसेच लता मंगेशकर यांचे स्केच या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.



या प्रदर्शनात ठेवण्यात आलेले एक चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 'लता जी' असे या चित्राचे शीर्षक असून 24 बाय 18 इंचाचं हे पेंटिंग आहे. यामध्ये गायिका लता मंगेशकर यांचे 299 चेहरे, एक सरस्वतीचा चेहेरा आणि जगातल्या प्रसिद्ध 630 महिलांचे चेहेरे या चित्रात रेखाटण्यात आले आहेत. या चित्राची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये करण्यात आलेली आहे. या पेंटिंगवर लता दिदींची स्वाक्षरी असल्यामुळे हे चित्र अनमोल आहे आणि मी ते कधीही विकणार नाही, असे चित्रकार रामकृपाल नामदेव सांगतात.



चित्रकार नामदेव यांनी कोणत्याही प्रकारचे चित्रकलेचे शिक्षण घेतले नसतानाही त्यांनी चित्रकला आवडीतून जोपासली आहे. 52 वर्षांचे चित्रकार नामदेव यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासूनच चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. मेडिटेशन संदर्भात नामदेव यांनी काढलेले एक चित्र दिया मिर्जा हिच्या घरी आहे. चित्रकार नामदेव हे बालपणापासूनच लता दिदींचे चाहते आहेत. प्रभादेवी येथील त्यांचे हे चित्रप्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य असून सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळात खुले रहाणार आहे.



हेही वाचा - 

गानविश्वाच्या अनभिषिक्त सम्राज्ञी...लता मंगेशकर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा