Advertisement

फाळणी...एक कटू आठवण !


फाळणी...एक कटू आठवण !
SHARES

"मी ट्रेनने पंजाबहून रावळपिंडीला परत येत होतो. पण स्टेशनवरच आमची ट्रेन थांबवण्यात आली. एक बेभान झालेला जमाव ट्रेनमध्ये शिरला. प्रत्येकाच्या हातात तलवार किंवा चाकूसारखी हत्यारं होती. आणि समोर दिसेल त्याला तो जमाव कापत सुटला होता. एका वृद्ध माणसाने मला बोगीच्या टॉयलेटमध्ये लपवलं आणि मी वाचलो."

हे शब्द आहेत पी. एस. कोचर यांचे. देशाला स्वातंत्र्य मिळून आता 70 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र फाळणीच्या वेळी उसळलेल्या दंगलींच्या आठवणी त्यातून बचावलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांच्या मनात अजूनही घर करुन आहेत. याच आठवणींना मोकळी वाट करुन देण्यासाठी गोदरेज इंडिया कल्चर लॅबतर्फे रिमेम्बरिंग पार्टिशन म्युझियम ऑफ मेमरीज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झाले आहे. फाळणीमुळे अनेकांनी जीव गमावला. तो काळ फारच दु:खाचा होता. फाळणीच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि लोकांना ती करूण कथा समजावी, याच उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले.

- परमेश शहाणी, आयोजक, गोदरेज इंडियन कल्चर लॅब


कर्नल जसपालसिंग बक्षी यांनी रावळपींडी शहरामध्ये फाळणीनंतर आलेले अनुभव त्यांनी मांडले.

फाळणीनंतर खूपच धक्का बसला होता. त्या काळी हिंसाचाराची भीती वाटत होती. त्यामुळे अनेक मुस्लिम बांधव गुरुद्वारामध्ये लपले होते. तब्बल 300 लोक त्या गुरुद्वारामध्ये लपले होते. पण बेभान जमावाने 300 लोकांसह गुरुद्वाराला आग लावली. त्या लोकांना जिवंत जाळण्यात आलं.

- कर्नल जसपालसिंग बक्षी

तीन दिवसांच्या या सेशनमधून चर्चा, कलाविष्कार, स्क्रिनिंग, प्रदर्शन आणि इतर विविध गोष्टींद्वारे फाळणीची माहिती देण्यात आली. या पार्टिशन म्युझियममध्ये फाळणी काळात होणाऱ्या भयंकर अत्याचारांपासून वाचण्यासाठी ज्या महिलेने विहिरीत उडी घेतली होती ती व्हेल ऑफ रिमेम्बर्स ही विहीर, त्या महिलेचा फुलकारी दुपट्टा, त्या काळातील घरांची कुलुपे, भांडी, कराची क्लब ओळखपत्र, तत्कालीन पाकिस्तानी चलन, पोस्टाचे तिकीट, तसेच फाळणीच्या वेळची काही नागरिकांची छायाचित्र आणि त्यांची माहिती प्रदर्शित करण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस प्रत्येक भारतीयाच्या लक्षात तर आहेच परंतु, हे स्वातंत्र्य मिळताना फाळणीसारख्या काही कटू आठवणी देखील सर्वांपर्यंत पोहचवण्याचा मानस आयोजकांचा होता.


भारत पाकिस्तानच्या फाळणीवर आधारित चित्रपट आपण पाहतो. पण त्यापेक्षा ते प्रत्यक्ष अनुभव हा जास्त महत्त्वाचा असतो. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या वेळी आपल्यात देशभक्ती जागृत होते. पण प्रत्यक्षात ते किती जणांनी भोगलंय, किती जणांनी अनुभवलंय ती या एक्झिबिशनद्वारे आम्हाला अनुभवता आली.

गौरी धुमाळ, विद्यार्थिनी

इतिहासाची पानं विविध अंगांनी जर पुन्हा पुन्हा चाळली तर, तो इतिहास अधिक स्पष्ट होतोच परंतु, त्याचे संदर्भ लक्षात घेता त्यातून आपला भविष्यकाळ मात्र अधिक सुकर होतो. आणि स्वातंत्र्याची खरी किंमत कदाचित अजून स्पष्ट होते!



हेही वाचा - 

मुंबईतून झाली 'ऑगस्ट क्रांती'ची सुरुवात!

लग्नाच्या हुंड्यात मिळाली होती मुंबई!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा