Advertisement

मुंबईतून झाली 'ऑगस्ट क्रांती'ची सुरुवात!


मुंबईतून झाली 'ऑगस्ट क्रांती'ची सुरुवात!
SHARES

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सर्वांनाच परिचित असेल. पण या आंदोलनाची खरी मुहूर्तमेढ रोवली गेली ती ९ ऑगस्ट १९४२ मध्ये आणि तेही मुंबईतच! दीडशे वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ मध्ये क्रांतीची ठिणगी पडली होती. स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवत ब्रिटिशांना नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या क्रांतीवीरांना अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट.  हा दिवस ऑगस्ट क्रांती या नावाने देखील ओळखला जातो.


सौजन्य


९ ऑगस्टपासून पेटले आंदोलन

मुंबईत ८ ऑगस्ट १९४२ मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन भरले. या अधिवेशनातच 'छोडो भारत' आंदोलनाचा प्रस्ताव मंजूर झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ ऑगस्टला महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात आवाज उठवला. ग्वालिया टँक मैदानातून गांधीजींनी ब्रिटिशांना 'छोडो भारत' आणि 'करेेंगे या मरेंगे'चा नारा दिला. गांधीजींचा 'भारत छोडो'चा मंत्र देशभरात एखाद्या वणव्यासारखा पसरला. ब्रिटिश सरकारला हाकलवून लावण्यासाठी या दिवशी आंदोलनाला सुरुवात झाली. ब्रिटिशांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ८ ऑगस्टच्या रात्रीच ब्रिटिशांना प्रस्तावाची पूर्वसूचना मिळाली. आपल्या विरोधात चाललेल्या षड्यंत्राची चाहूल लागताच ब्रिटिशांनी ९ ऑगस्टला पहाटे पाच वाजता मुंबईतल्या बिर्ला हाऊसमधून महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक केली. "आता प्रत्येकजण पुढारी होईल,” असा कानमंत्र गांधीजींनी त्यावेळी भारतीयांना दिला


सौजन्य

महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना चिंचवड स्टेशनवर उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. नेत्यांना अटक झाली तर आंदोलन होणारच नाही, असा ब्रिटिशांचा अंदाज होता. पण परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी आणखीनच चिघळली. महात्मा गांधींच्या अटकेनंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. गांधीजींनी आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करायचे असे आदेश दिले होते. पण ब्रिटिशांना हुसकावून लावायचे या हेतूने झपाटलेल्या भारतीयांनी या आंदोलनाला हिंसक वळण दिले. गावागावात ब्रिटिशांविरोधात आंदोलन पेटले. सरकारी कचेऱ्यांची जाळपोळ, लुटपाट, मालमत्तेचा विध्वंस केला जाऊ लागला. ब्रिटिशांनी यासाठी महात्मा गांधींना जबाबदार धरले. पण आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने व्यथित झालेल्या महात्मा गांधींनी आंदोलन काळात २१ दिवस उपोषण केले. पुढे १९४४ मध्ये महात्मा गांधींची प्रकृती खूपच नाजूक झाल्याने ब्रिटिशांनी त्यांची सुटका केली.

सौजन्य

पाच वर्षांनंतर भारत स्वतंत्र

१९४२च्या आंदोलनानंतर निर्वाणीच्या लढाईची बीजे रोवली गेली. आता ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावायचे, असेच ध्येय प्रत्येकाच्या मनात होते. भारताला स्वातंत्र्य देण्यावाचून गत्यंतर नाही, हे आता ब्रिटिशांना समजून चुकले होते. ९ ऑगस्ट १९४२ नंतर म्हणजेच पाच वर्षांनी ब्रिटिशांनी अखेर भारत सोडण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेल्या ब्रिटिशांना भारतासारख्या मोठ्या भूखंडाच्या वसाहतीचा कारभार पहाणंही एव्हाना जिकिरीचं झालं होतं. भारताला स्वातंत्र्य मिळण्यात या परिस्थितीचा फायदाच झाला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा