जागतिक महिला दिनी महिला रस्त्यावर

 Antop Hill
जागतिक महिला दिनी महिला रस्त्यावर

अँटॉप हिल - येथील मोनोरेल स्थानकाखालील एस.एम. मार्गावर महिला दिनानिमित्त आपल्या मागण्यांसाठी महिला रस्त्यावर उतरल्या. कल्पक रेसिडेंट महिला असोसिएशनच्या वतीने सरकार आणि पालिका प्रशासनाविरोधात हातात फलक घेऊन महिलांनी घोषणाबाजी केली. दरम्यान अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांनी या निदर्शनाची तात्काळ दखल घेत महिलांना तातडीने पोलीस संरक्षण दिले. तसेच त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

वडाळा आणि अँटॉप हिल परिसरातील पदपथावरील अतिक्रमण, मोनोरेलच्या दोन खांबातील अवैध पार्किंग, रात्रीच्या वेळी पार्किंगमधील वाहनात चालणारे अनधिकृत धंदे, रात्री उशिरापर्यंत सुरू असणारी दारूची दुकाने तसेच मद्यपींचा धिंगाणा, महिलांचे संरक्षण, पाणी आणि वीज चोरी या समस्यांकडे पोलीस, पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा या निदर्शनामागे मुख्य उद्देश होता.

गेल्या दहा वर्षांपासून सरकार तसेच पालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही स्थानिक पोलीस तसेच पालिका अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. तसेच आजतागायत कोणतेही ठोस पाऊल सदरील समस्यांविरोधात सरकार आणि पालिका प्रशासनाने उचलले नाही, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. याची वेळेत दखल न घेतल्यास पुन्हा आंदोलन करू असा संतप्त इशारा या महिलांनी दिला आहे.

Loading Comments