१७३ वर्षांपासून जपलेली गणेशोत्सवाची परंपरा


  • १७३ वर्षांपासून जपलेली गणेशोत्सवाची परंपरा
SHARE

शिसवी लाकूड, मिश्र धातूचे मोठे-मोठे चौरंग, पितळेच्या मोठ्या समया, लामण दिवे, हरणाच्या आकाराची उदबत्तीची घरे... १८४५ सालची ही सजावट! हा बाप्पा आहे दादरच्या प्रताप मॅन्शनमधील अजिंक्य यांच्या कुटुंबातला. १८४५ सालापासून अजिंक्य यांचं कुटुंब पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. अजिंक्य यांच्या घरातील गणपतीचे यंदाचे हे १७३वे वर्ष आहे!

आधुनिक मुंबईचे शिल्पकार आणि भाऊचा धक्का बांधणारे लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उर्फ भाऊ रसूल यांच्या घरातील हा गणपती. भाऊंनी आपल्या नातवाच्या जन्मानंतर त्यानिमित्ताने १८४५ साली घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली. आता त्यांची सहावी पिढी त्याच उत्साहाने ही परंपरा पुढे चालवत आहे. या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे दीडशे ते पावणे दोनशे वर्षांपूर्वी भाऊंनी गणेशोत्सवाची ज्या साहित्याने सजावट केली होती, त्याच वस्तूंनी आजही सजावट केली जाते. सर्व साहित्य वंशपरंपरागत चालत आले आहे. गणपतीच्या पूजेतील पंचामृताची भांडीही औरंगजेबाचा मुलगा आझम शहा आणि कामबक्ष यांच्या काळातील चलनी नाण्यांना चांदीचे जोडकाम देऊन बनवण्यात आली आहेत. गणपतीच्या मागचा आरसाही १५० वर्षांपूर्वीचा आहे आणि तोही हातकारागिराने बनवलेला. पितळेच्या झांजा देखील पत्रा ठोकून बनवलेल्या आहेत!


आमच्या सहा पिढ्यांनी गणपतीची परंपरा जपली आहे आणि पुढेही जपली जाणार. पारंपरिक सजावट तर आमचे वैशिष्ट्य आहेच, शिवाय १७३ वर्षांपासून गणपतीची मूर्ती एकाच प्रकारची आणि आकाराची आहे. गणेशोत्सवादरम्यान वापरण्यात येणाऱ्या जुन्या साहित्यांची खास काळजी घेतली जाते. पूजेची भांडी, समया, लामण दिवे, चौरंग या सर्व वस्तू व्यवस्थितपणे कापडात गुंडाळून मोठ्या पेटाऱ्यात ठेवल्या जातात.

विश्वास अजिंक्य


काळ बदलला, अनेक वर्षे गेली पण गणेशोत्सव साजरा करण्याची अजिंक्य कुटुंबाची रीत आजही एकोणीसाव्या शतकातलीच आहे. त्यामुळे अजिंक्य यांच्या घरातील बाप्पाच्या दर्शनाला येणारे भाविक कळत नकळत जुन्याच आठवणीत रममाण होतात.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या