Advertisement

जागर महिलाशक्तीचा : धारावी झोपडपट्टीत पहिली महिला पतपेढी!


जागर महिलाशक्तीचा : धारावी झोपडपट्टीत पहिली महिला पतपेढी!
SHARES

आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टींपैकी एक असलेली मुंबईतील धारावीची झोपडपट्टी आपणा सर्वांनाच परिचित आहे. या धारावीतच अनेक छोटे-छोटे विभागही आहेत. धारावीतल्या कुंभारवाडा परिसरातील क्रॉस रोड या ठिकाणी समीना बीबी अब्दुल चाळ आहे. 1 प्लस 1 अशी घरांची रचना असलेल्या या चाळीच्या पहिल्याच रूमच्या माळ्यावर 10 बाय 10 ची खोली आहे. त्या खोलीतच एक महिला पतपेढी आहे. जेथे धारावीच्या महिला एकत्र येऊन ती पतपेढी चालवतात.आपण या पतपेढीत प्रवेश केला की आपल्याला एक 75 वर्षांची तरुण महिला खुर्चीवर बसून काहीतरी लिहीत असलेली दिसेल. जर तुम्ही तिथे गेलात, तर खूप प्रेमाने तुमची विचारपूस करते. ही महिला म्हणजे धारावीतल्या एकमेव महिला पतसंस्था असलेल्या आकांक्षा पतपेढीची संस्थापिका, अध्यक्षा अनुसया माने.

'मानेबाई' नावाने सर्वांमध्ये फेमस असलेल्या आणि धारावी विभागात पहिला महिला बचत गट सुरू करणाऱ्या अनुसया माने या फक्त सहावी पास आहेत, असे सांगितले तर कुणालाही धक्काच बसेल! अनुसया माने यांनी 1988 साली महिला बचत गट चालवायला सुरुवात केली. 20 महिलांचा हा पहिला बचत गट त्यांनी 2 वर्षे चालवल्यानंतर व्यवहार सुलभ व्हावा यासाठी 10 - 10 महिलांचे गट तयार करून त्याला वेगवेगळी नावे दिली गेली. बचत गटांची संख्या 100 झाली आणि हजारो सदस्य झाल्यानंतर माने यांनी पतपेढी सुरू करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 30 वर्षी सुरु केलेलं हे काम आज 40 वर्षांनंतरही अनुसया माने तितक्याच कार्यक्षमतेने करतात.सुरुवातीला अनुसया यांनी प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले. त्यातून 800 लोकांना साक्षर केले. 1987 साली कुटुंब कल्याणाची कामे देखील त्यांनी केली. पूर्वी बचत गटाच्या योजना महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हत्या. जेव्हा 20 महिलांचा बचत गट अनुसया यांनी सुरू केला, तेव्हा त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. पहिला बचतगट सुरू करायला 2 वर्षे लागली. 'ही बाई पैसे खाईल, पैसे घेऊन पळून जाईल', असे लोकांना वाटत होते. त्यामुळे लोकांची विश्वासहर्ता मिळवायला वेळ जाऊ द्यावा लागला.

1990 साली महाराष्ट्रात बचत गट मार्गदर्शनाची योजना आली. 1992 ला कामाला सुरुवात केल्यानंतर 1994 साली पहिला बचतगट सुरू करण्यात यश आले. प्रत्येक महिलेच्या घरी जाणे आणि पती, सासू, सासरे यांची समजूत घालणे, ही कामे त्यांना करावी लागली. अनुसया यांना पतीचा पूर्ण पाठिंबा होता. परंतु, सासूबाई जुन्या विचारसरणीच्या असल्यामुळे त्याकाळी अनुसया यांची तारेवरची कसरत झाली. घर, बचत गट आणि मुले सांभाळताना या महिला बचत गटांचा पसारा वाढला. त्यामुळे अनुसया बचत गटातील महिलांना घेऊन अहमदाबादला गेल्या. अहमदाबादमध्ये महिलांनी महिलांसाठी चालवलेली भारतामधील सर्वात मोठी बँक आहे. तेव्हा ती बँक पाहिल्यानंतर धारावीतल्या महिलांसाठी देखील आपण एक बँक सुरू करावी, असा विचार अनुसया यांच्या मनात आला.

आपली संकल्पना अनुसया यांनी बँकेच्या डायरेक्टरला ऐकून दाखवली. अनुसाय यांच्या या प्रस्तावाला डायरेक्टरने अनुमोदन दिले. परंतु, ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी मात्र अनुसया यांना खूप मेहनत घ्यावी लागली. 6 महिने प्रयत्न केल्यानंतर आकांक्षा महिला पतपेढीची स्थापना 2006 साली करण्यात आली. सध्या 100 पेक्षा अधिक बचत गटाच्या महिला या पतपेढीच्या सदस्य आहेत. सर्व महिला दूध, भाजी विक्रेत्या, पापड लाटणाऱ्या गृहिणी आहेत. ही पतपेढी महिलांनी महिलांसाठी चालवलेली एकमेव पतपेढी आहे. या पतपेढीच्या माध्यमातून अनेक मुलांचे शिक्षण आणि मुलींची लग्न देखील झाली. तर अनेकांचे संसार आणि आयुष्य गेली 12 वर्षे अनुसया माने यांच्या प्रयत्नाने सावरले गेले.

संस्थेच्या माध्यमातून अन्नपदार्थ बनवण्यासाठी खार रोड आणि धारावी निसर्ग उद्यान येथे महिलांसाठी शेल्टर तयार करून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिलांसाठी रोजगार निर्मिती झालेली आहे. आता या महिला हजारो लोकांच्या खाद्यपदार्थाच्या ऑर्डर पूर्ण करतात.


संस्थेतर्फे भारताबाहेर जाण्याचा योग

संस्थेत राहून निरपेक्ष काम आणि मेहनत घेतल्यामुळे अनुसया माने यांना बाहेर देशात जाण्याचा योग आला. तिकडे महिलांचे काम कसे आहे? हे पाहण्यासाठी अनुसया थायलंडला गेल्या.

परदेशात गेल्यावर कळले मी भारतात जन्माला आले हे किती भाग्याचे आहे. थायलंडचा एक चेहरा आपल्याला दिसतो. परंतु, त्याची दुसरी बाजू भीषण आहे. तिकडे गरीब, अती गरीब आणि श्रीमंत, अती श्रीमंत असा वर्ग आहे. तिथे देह विक्रीचे प्रमाण जास्त आहे. माझ्या कामामुळे आयुष्याच्या या टप्प्यात मी अतिशय आनंदी आहे. 3 महिलांना घेऊन कामाला सुरुवात केली. आज या महिलांची संख्या 1 हजाराहून अधिक आहे.

अनुसया माने, संस्थापिका, आकांक्षा पतपेढी


समाजकार्याची कुणी दखल घेतली नाही...

सरकार महिलांसाठी अनेक सोयी सुविधा देत आहे. पण 12 वर्षे पेढी चालवत असूनही अजून ऑफिससाठी सरकार जागा देऊ शकलेले नाही. 'आजपर्यंत भाड्याच्या पोटमाळ्यावर आम्ही संस्थेचे काम करतो. इलेक्शनच्या वेळी आमदार आणि खासदार मतांसाठी दारात येतात. आम्हा महिलांना पेढीची जागा, नवीन योजनांचे गाजर दाखवून मत घेतात. निवडून आल्यानंतर कुणी आमच्याकडे फिरकत नाही. आमच्यासाठी बोलायला त्यांना वेळ नसतो,' असे अनुसया माने सांगतात.हेही वाचा - 

जागर महिलाशक्तीचा : देवाला देवपण देणाऱ्या कलेचा वारसा जपणारी लेक

पोवाड्यांची राणी...लोकशाहीर सीमा पाटील


संबंधित विषय
Advertisement