Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

जागर महिलाशक्तीचा : पोवाड्यांची राणी...लोकशाहीर सीमा पाटील


जागर महिलाशक्तीचा : पोवाड्यांची राणी...लोकशाहीर सीमा पाटील
SHARES

महाराष्ट्राला लाभलेले लोककलेचे वैभव अगदी पारंपारिक पद्धतीने जपण्याचे कार्य महाराष्ट्रातील कलावंत वर्षानुवर्षे करत आहेत. त्यामध्ये भारुड, कीर्तन, पोवाडा, लावणी आणि संगीत आशा लोककला महाराष्ट्रात पहायला मिळतात. या लोककलांमध्ये विशेष प्रसिद्ध असलेली कला म्हणजे पोवाडा (शाहिरी). 

पूर्वीच्या काळी असे पोवाडे म्हणणारे शाहीर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पहायला मिळायचे. पठ्ठे बापूराव, शाहीर साबळे यांच्यासारखे शाहीर महाराष्ट्राला लाभले. या सर्वांचे पोवाडे ऐकत एक मुलगी महाराष्ट्रात महिला शाहीर बनली. 'झी मराठी' वाहिनीच्या टायटल साँगमध्ये एक तडफदार महिला शाहीर आपल्याला दिसते. डफावर हात मारत पुरुषांसारखा पोवाडा गाणारी ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध महिला लोकशाहीर सीमा पाटील आहेत.अशा घडल्या सीमा पाटील...

स्टेज आर्टिस्ट ते शायरी व्हाया लावणी असा सीमा यांचा प्रवास मोठा गंमतीशीर आहे. कराडसारख्या एका छोट्याशा शहरात वाढलेल्या सीमा यांना लहानपणापासूनच कलेमध्ये रस होता. त्याचे कारणही तसेच होते. त्यांचे वडील नाट्य कलावंत काशीनाथ गुरव. सीमा लहानपणी शाळेच्या स्नेहसंमेलनापासून सर्वच कार्यक्रम आणि इतर सांस्कृतिक सोहळ्यात आपली कला सादर करत असत. 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न मुंबईमध्ये साकीनाका येथे राहणाऱ्या रमेश पाटील यांच्याशी झाला. रमेश पाटील हे तेलाचा व्यवसाय करतात, तसेच त्यांचे दुकान असल्यामुळे लग्नानंतर सीमा घरचे काम करून झाल्यानंतर दुकानातली कामंसुद्धा करत.घरचे काम आणि जबाबदाऱ्या पार पाडताना आपली कला इथेच संपून जाणार असे सीमा पाटील यांना वाटू लागले. मात्र सीमा पाटील यांचे सासरे निवृत्ती पाटील हे स्वतः शाहीर होते. घरगुती कार्यक्रमात सीमा यांचे अंगीभूत गुण त्यांनी ओळखले. साकीनाका येथील एका मंडळाच्या कार्यक्रमात सीमा यांनी लावणी नृत्य सादर केले. कलेची जाण असलेल्या निवृत्ती पाटील यांनी सुनेचे भरभरून कौतुक केले. त्यानंतर सीमा प्रत्येक स्थानिक कार्यक्रमात आपली कला सादर करत असत.

एकदा लोकशाहीर सीमाची ही कला रवींद्र मोरे यांनी पहिली. कोणत्याही व्यावसायिक कलाकाराला शोभेल अशी ही कला पाहून सीमा यांच्या कलेला एक व्यासपीठ मिळवून द्यायचे त्यांनी ठरवले. महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाचे संतोष परब आणि मोरे यांनी सीमा यांची भेट घेतली. सीमा यांनी आपल्यासोबत काम करावे, अशी त्यांनी विनंती वजा इच्छा व्यक्त केली. 

नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारे संतोष परब आणि त्यांच्या पत्नी सायली परब यांनी सीमा यांची तालीम पाहिली. परंतु, पहिल्यांदा मोठ्या व्यासपीठावर काम करणे कोणत्याही कलाकारासाठी आव्हान असते. त्यामुळे काही प्रयोगांसाठी सीमा यांना समूह नृत्यात संधी देण्यात आली होती. पण सीमा यांच्याकडे गायनाची कला देखील असल्यामुळे पुढे सीमा यांनी लावणी नृत्यासोबत गाणे गायला सुरुवात केली. पुढे सीमा महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान या संस्थेचा एक अविभाज्य भाग बनल्या.एकदा कलाकार म्हणून प्रकाश झोतात आल्यानंतर सीमा यांना दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन घ्यावे असे वाटू लागले. म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर कृष्णाजी साबळे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परब आपल्या कलाकारांना घेऊन शाहीर साबळे यांच्याकडे गेले. शाहीर साबळे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सीमा यांच्यामधले सुप्त गुण ओळखून यांच्या पहिल्या पत्नी भानुश्री साबळे यांनी 50 वर्षांपूर्वी लिहलेला पोवाडा सादर करण्याचे सुचवले. खरेतर हा पोवाडा खूप कठीण आहे. शाहीर साबळे यांच्या कलापथकात हा पोवाडा केदार शिंदे आणि मंगेश दत्त सादर करत असत. परंतु, हे अवघड आव्हान स्वीकारून सीमा यांनी खूप मेहनत घेतली. 2005 साली झालेल्या कुलू महोत्सवात सीमा पाटील यांनी तो पोवाडा सादर केला. 

पहिल्याच सादरीकरणात जो प्रतिसाद मिळाला तेव्हापासून आत्मविश्वास वाढला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्यासह अनेक महापुरुषांचे पोवाडे गायला सुरुवात केली. पोवाड्यासाठी मुंबई आणि पुणे महापौर पुरस्कार देखील मिळाला. आपल्या यशात सासरे निवृत्ती पाटील, पती रमेश पाटील, तसेच सायली आणि संतोष परब यांचा मोलाचा वाटा आहे.

सीमा पाटील, लोकशाहीर 


पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली

महिला शाहिरीची परंपरा सातारा जिल्ह्यात सुरू झाली. सुरुवातीला सातारच्या आंबूताई विभूते यांच्या शाहिरीने महाराष्ट्राला भुरळ घातली. तीच महिला शाहिरीची परंपरा सीमा पुढे नेत आहेत. डोक्यावर मर्दानी फेटा, एका हातात चांदीचे कडे आणि दुसऱ्या हातात डफ या थाटात पुरुषांनी सादर केलेला पोवाडा आपण अनेकदा पहातो. परंतु, या क्षेत्रात असलेली पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत सीमा पाटील या महिला कलावंताने शाहिरी कलेत आपला वेगळा ठसा उमटवला. मळलेल्या वाटा मोडून नवी वाट निर्माण करणाऱ्या सीमा यांचे कलाक्षेत्रातील योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे.


१९९५ पासून मुंबईत शाहिरी कलेचा प्रवास

सीमा सांगतात, १९९५ पासून मुंबईत या शाहिरी कलेचा प्रवास सुरू झाला. परंतु, खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली ती निर्माते दिग्दर्शक संगीतकार गायक जॉली मोरे, शाहीर संभाजी भोरे आणि निर्माते रविंद्र मोरे यांच्याकडून.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जो ज्येष्ठ शाहीर साबळे यांच्या पत्नीने लिहलेला "महाराष्ट्र भूमी बहुगुणी" हा पोवाडा पहिल्यांदा गायला आणि त्याचे सर्व श्रेय महाराष्ट्र सांस्कृतिक न्यासाचे विश्वस्त आणि निर्माते संतोष परब यांना जाते. मग भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोवाड्याने समाजात एक प्रतिष्ठा मिळवून दिली. संपूर्ण महाराष्ट्रात, विदर्भ आणि मराठवाड्यात मैदान गाजवले याचा अभिमान वाटतो.

सीमा पाटील, लोकशाहीर राष्ट्रपुरुषांबरोबरच राष्ट्रमातांचेही पोवाडे

सीमा म्हणतात 'राष्ट्रपुरुषांबरोबरच भारताच्या इतिहासातील राष्ट्रमातांचेही मी पोवाडे गाते. राजमाता आई जिजाऊ, सावित्री, रमाई, यशोधरा यांचे देखील पोवाडे गाते. शाहीर नसते, तरी नृत्यदिग्दर्शन करायला आवडले असते, शास्त्रीय संगीत आणि कथ्थक या दोन्ही वर्गाच्या मध्यमांपर्यंत माझे शिक्षण झाले आहे. डिग्री कोर्स पूर्ण करायचा आहे. ही शाहिरी कला भारतातील प्रत्येक मुली आणि महिलांनी शिकावी, सोबतच ती जोपासावी असे मला वाटते. मी तशी संपूर्ण वेळ कलेची जोपासना करतच आहे. माझे गुरू रविंद्र मोरे आणि गुरू माऊली शुभांगी घोगले यांच्या साथीने 'कलाविष्कार नृत्य संगीत अकादमी' २०१० पासून चालवत आहे. ही संस्था चांदिवली म्हाडा येथे असून २०० विद्यार्थी विविध कला शिकत आहेत.


आतापर्यंत मिळालेले पुरस्कार

  • मुंबई महापौर पुरस्कार - ८ मार्च, २००८ 
  • जिजाऊ पुरस्कार - १६ डिसेंबर, २०१५
  • महाराष्ट्र रत्न पुरस्कार - ४ एप्रिल, २०१६
  • पुणे महापौर पुरस्कार - २४ मे, २०१७
  • रमाई फाऊंडेशन (औरंगाबाद) - २७ मे, २०१७हेही वाचा - 

जागर महिलाशक्तीचा : देवाला देवपण देणाऱ्या कलेचा वारसा जपणारी लेक

वडिलांच्या प्रेरणेतून घेतला स्वच्छतेचा ध्यास


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा