Advertisement

गोविंदांचा विमा १० लाखांचा!

प्रत्येक गोविंदा पथकाने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक गोविंदाचा १० लाख रुपयांचा विमा काढावा आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची सूचना दहिहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी केली.

गोविंदांचा विमा १० लाखांचा!
SHARES

दरवर्षी दहिहंडीचा सण साजरा करताना थरांवरून कोसळून शेकडो गोविंदा जखमी होतात, तर काहींना आपल्या प्राणांनाही मुकावं लागतं. अशा दुर्दैवी घटनांमध्ये गोविंदांच्या कुटुंबांची चांगलीच परवड होते. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक गोविंदा पथकाने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक गोविंदाचा १० लाख रुपयांचा विमा काढावा आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची सूचना दहिहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघात गुरूवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत न्यायालयाच्या नियमांचं पालन करण्याचे निर्देश दहिहंडी पथकांना देण्यात आले.


सुरक्षेला प्राधान्य

राज्यभरात दीड हजारांपेक्षा अधिक गोविंदा पथकं आहेत. दहिहंडीच्या दिवशी थर लावताना दरवर्षी २५० ते ३०० गोविंदा गंभीर जखमी होतात, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे गोविंदांच्या कुटुंबाचे आर्थिक हाल होऊ नयेत म्हणून काही मंडळांनी २००३ पासून गोविंदांचा विमा उतरवण्यास सुरुवात केली.


'अशी' वाढली विम्याची रक्कम

२००३ ते २०१५ या काळात गोविंदांचा प्रत्येकी दीड लाख रुपयांपर्यंतचा विमा काढण्यात येत होता. २०१६ मध्ये विम्याची रक्कम अडीच लाख करण्यात आली. तर २०१७ पासून विम्याची रक्कम १० लाखांवर गेली. त्यामुळे उत्सव साजरा करण्यासोबतच प्रत्येक दहिहंडी मंडळाने न चुकता गोविंदांचा विमा काढण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यंदा दहिहंडी पथकांनी गुरूपोर्णिमेपासूनच गोविंदांचा विमा काढायला सुरूवात केल्याचंही पडेलकर यांनी सांगितलं.



१४ वर्षांखालील मुले नकोच

गोकुळाष्टमीला महिनाभर शिल्लक राहिला असून गोविंदा पथकांनी सरावालाही सुरूवात केली आहे. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयानं २० फूट उंच दहिहंडीची मर्यादा घालून दिली होती. मात्र, दहिहंडी समन्वय समिती आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे उंचीवरील बंदी मागे घेण्यात आली आहे. तरीही अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १४ वर्षांखालील मुलांचा दहिहंडीच्या कुठल्याही थरात समावेश करू नये, असं आवाहन समितीतर्फे करण्यात आलं.


जेवढा सराव, तेवढेच थर

सराव करत असताना जितक्या थरांचा सराव केला आहे, तितकेच थर दहीहंडीच्या दिवशी लावा. गोविंदांना कुठल्याही प्रकारची गंभीर दुखापत होऊन नये यासाठी थर लावताना सेफ्टीसाठी डोक्यात हॅल्मेट घालणे, चेष्ट गार्ड, हार्नेस बेल्ट, सेफ्टी बेल्ट घालणे गरजेचं असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं.


आयोजकांकडून योग्य पारितोषिक

दहिहंडीच्या दिवशी सर्वपक्षीय नेत्यांकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं. मात्र गोविंदा पथकांना योग्य पारितोषिक दिलं जात नाही. त्यामुळं गोविंदा पथकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माणं होतं. यंदा आयोजकांनी गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेताना गोविंदा पथकांना त्यांच्या थरांनुसार पारितोषिक देण्याचं आवाहनही समन्वय समितीनं केलं.



हेही वाचा-

उत्सवाचं बाजारीकरण थांबवा - राज ठाकरे

'दहिहंडीवरचे निर्बंध हटवा, नाहीतर अध्यादेश काढू'


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा