यंदा देवीही विराजमान होणार इकोफ्रेंडली मखरात


SHARE

राज्य शासनानं प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी लागू केली आहे. या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी अनेक मंडळं यंदा पर्यावरणपुरक आणि इकोफ्रेंडली देखावा साकारणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोलबंदी जाहीर केली होती. या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी अनेक मंडळांच्या देखाव्यात ‘पर्यावरण’, ‘प्लॅस्टिक बंद’, ‘स्वच्छता’ या विषयावर आधारित देखावे तयार केले जात आहेत. यंदाचं नवरात्रौत्सव इकोफ्रेंडली करण्यासाठी काही मंडळं कागद आणि पुठ्ठ्यांपासून तयार करण्यात आलेल्या मखरांचा वापर करत आहे.


कागदी मखरांचं प्रदर्शन

गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव इकोफ्रेंडली साजरा करण्याकडे नागरिकांचा कल असून अनेक मंडळात कागदापासून बनवलेल्या मखरात देवी विराजमान करण्यात येणार आहे. गणेश गल्ली, लालबाग या भागात ‘उत्सवी’ या संस्थेने कागदी मखरांचं प्रदर्शन भरवलं आहे.

कागदी आणि पुठठ्यांचं मखर बनवण्यासाठी उत्सवी या संस्थेनं पुढाकार घेतला असून मागील १७ वर्षांपासून पर्यावरणपूरक मखरांची निर्मिती केली जात आहे. त्याशिवाय घट बसवण्यासाठी टोपल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असून विशिष्ट नक्षीकाम केलेल्या मातीच्या मडक्यांनाही यंदा मागणी असल्याचं दिसून येत आहे.

प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची खूप हानी होते. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये, यासाठी कागदी मखर बनवण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात देवींच्या मखरासाठी काही मंडळाच्या मागणीप्रमाणे मखरांची मांडणी, डिझाइन तयार केलं जातं.
- नानासाहेब शेंडकर, संस्थापक, उत्सवी संस्था

संबंधित विषय
ताज्या बातम्या