Advertisement

गणेशोत्सव २०१९ : 'जंगलबूक'चा आकर्षक देखावा पाहण्यासाठी 'या' मंडळाला भेट द्या

मुंबईतल्या कित्येक मंडळांमधून वेगेवगेळ्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात येतो. फक्त सामाजिक संदेशच नाही तर सामाजिक कार्यात देखील या मंडळांचा समावेश असतो. मुंबईतल्या अशाच एक मंडळाचा इतिहास, परंपरा आणि सामाजिक भान याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत.

गणेशोत्सव २०१९ : 'जंगलबूक'चा आकर्षक देखावा पाहण्यासाठी 'या' मंडळाला भेट द्या
SHARES

आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी जल्लोषात स्वागत केलं जातं. घरात एक वेगळाच उत्साह जाणवतो. फक्त घरातच कशाला सार्वजनिक मंडळांमध्ये देखील बाप्पा विराजमान होतो. स्वराज्याची मुहर्तमेढ रोवण्याच्या हेतूनं सार्वजनिक गणपतीची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली. आजतागायत ही परंपरा सुरू आहे. मुंबईतल्या कित्येक मंडळांमधून वेगवेगेळ्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात येतो. फक्त सामाजिक संदेशच नाही तर सामाजिक कार्यात देखील या मंडळांचा समावेश असतो. मुंबईतल्या अशाच एक मंडळाचा इतिहास, परंपरा आणि सामाजिक भान याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत. हे मंडळ म्हणजे दादर विभागातील सर्वात जुने दादरचा मानाचा गणपती आहे


'जंगलबुक' थीमवर देखावा  

दादरचा मानाचा गणपती हे गणेश मंडळ दादर विभागातील सर्वात जुनं मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १९५६ साली झाली. सामाजिक उपक्रमाकडे कल असलेल्या या मंडळाला यंदा ६४ वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्तानं यंदाच्या वर्षी या मंडळानं 'जंगलबूक' थीमवर आधारीत देखावा साकारला आहे. इको फ्रेंडली सजावटीच्या मदतीनं ही थीम उभारण्यात येणार आहे. यात लाकडाचा भुसा, टेडिबेअर, वेली यांचा वापर करण्यात येणार आहे. या देखाव्याती हरीण आणि पांडा हे बच्चे कंपनीसाठी आकर्षण असणार आहे. विशेष म्हणजे या मंडळात प्लास्टिक किंवा थर्माकोल बंदीच्या आधीपासूनच त्यांनी त्याचा वापर बंद केला होता.


'असं' मिळालं नाव

१९५६ साली विभागातील काही वरिष्ठ मंडळांनी सामाजिक ऐक्य आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी बालमित्र सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला या गणपतीला केवळ 'सार्वजनिक गणपती' या नावानं ओळखलं जात होतं. त्यानंतर काही भाविकांनी या गणपतीला नवस केले. ते पूर्ण झाल्यानंतर भाविकांनी दागदागिने देण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर काही श्रद्धाळू भाविकांनी या बाप्पाला 'दादरचा मानाचा गणपती' हे नाव दिलं. तेव्हापासून हा गणपती 'दादरचा मानाचा गणपती' या नावानं प्रसिद्ध झाला.


उत्कृष्ठ देखावे

गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळानं उत्कृष्ठ देखावे सादर केले आहेत. काही वर्षांपूर्वी मुंबईत मलेरियाची साथ पसरली होती. त्यावेळी मलेरियापासून मुक्तीसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबावण्यात येत होत्या. याच उपाययोजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी या मंडळानं एक चलचित्र साकरलं होतं. त्याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्त झाल्याच्या वर्षी त्याचा क्रिकेट विश्वातील इतिहास सांगणारा देखावा तयार केला होता.


सामाजिक संदेेशाचे देखावे

विशेष म्हणजे दादरच्या परिसरातील गर्दीचा विचार करून हे मंडळ गणपतीच्या मूर्तीची स्थापना इमारती खालील मंदिरात करतं. या मंदिरातच गणरायाची मूर्ती विराजमान होते. आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, या हेतुनं नेहमीच विविध सामाजिक संदेश देणारे हे मंडळाचे देखावे आणि सामाजिक उपक्रम पाहण्यासाठी अनेक भाविक इथं आवर्जून येतात.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा