Advertisement

त्यांनी धावत्या ट्रेनमध्येच लग्न लावलं की हो!

मुंबईकर काहीही करु शकतात याचा प्रत्यय नुकताच एका व्हायरल व्हिडिओमधून आला! काय केलं मुंबईकरांनी? अहो चक्क धावत्या ट्रेनमध्ये लग्नच लावलं की हो!

त्यांनी धावत्या ट्रेनमध्येच लग्न लावलं की हो!
SHARES

मुंबईकरांसाठी काहीही अशक्य नाही याचा प्रत्यय नुकताच एका व्हायरल व्हिडिओमधून आला! काय केलं मुंबईकरांनी? अहो चक्क धावत्या ट्रेनमध्ये लग्नच लावलं की हो!


लोकल खरी 'लाईफ'लाईन!

मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन म्हटली जाते. आणि तिचा प्रत्यय या व्हिडिओमध्ये आला. दिवसाचे काही तास, त्या हिशोबात महिन्याचे काही दिवस आणि त्याच हिशोबाने वर्षाचा किमान एक महिना तरी मुंबईकर या लोकलने प्रवास करत असतो. त्यामुळे ही शब्दश: मुंबईकरांची 'लाईफ'लाईनच म्हणावी लागेल. त्यामुळे आपल्या सण-उत्सवातही मुंबईकर या लोकलला सहभागी करून घेत असतो. असाच काहीसा प्रकार गुरुवारी मुंबईतल्या एका लोकलमध्ये पहायला मिळाला. या लोकलमध्ये प्रवाशांनी चक्क लग्नच लावलं!


वाजंत्री, मंगलाष्टकं आणि आंतरपाट!

इतर कोणत्याही लग्नाप्रमाणे या लग्नातही वर-वधूला नटून-थटून आणलं गेलं होतं. वाजंत्री होती, मंगलाष्टकं होती, वऱ्हाडी होते, अंतरपाठही होता! सर्वांनी एकसुरात मंगलाष्टकं म्हटली आणि एकदाचं शुभमंगल सावधान केलं आणि मंडळी खुश झाली. आणि तेही चक्क धावत्या ट्रेनमध्ये!


बाकी जोडा शोभेलसा होता!

आता धावत्या ट्रेनमध्ये लग्न लागलेलं हे जोडपं नक्की होतं तरी कोण? तर हे होते नववधू तुळसाबाई अर्थात तुळशी आणि नवरोबा बाळकृष्ण! दिवाळीनंतर साधारण आठवड्याभरानंतर दरवर्षी तुळशीचं लग्न लावलं जातं. पण या मुंबईकरांसाठी मात्र त्यांची रोजच्या प्रवासाची लोकल इतकी जवळची झाली होती, की त्यांनी थेट धावत्या ट्रेनमध्येच हा विवाहसोहळा पार पाडला. आणि तोही अगदी यथोचित!

हे लग्न कसं झालं पहायचंय? मग पहा:



ही लोकल नक्की कोणती होती? ही मंडळी नक्की कोण होती? हे लग्न कसं 'अरेंज्ड' झालं? कधी झालं? नक्की कोणत्या ठिकाणी झालं? या कोणत्याच प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमधून मिळत नाहीत. ती जाणून घ्यायची आवश्यकताही नाही. पण या व्हिडिओमधून मुंबईकरांचा उत्साह आणि लोकलचं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं हे मात्र नक्की! या भन्नाट लग्नाला, त्याहून भन्नाट विवाहस्थळाला आणि या दोघांहून महत्त्वाच्या अशा सत्कारमूर्ती नववधू आणि वराला 'मुंबई लाइव्ह'च्या शुभेच्छा!



हेही वाचा

फेरीवाल्यांचं काय होणार माहिती आहे?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा