Advertisement

जाणून घ्या 'बकरी ईद'चा खरा अर्थ!


जाणून घ्या 'बकरी ईद'चा खरा अर्थ!
SHARES

'बकरी ईद' निमित्त शनिवारी सकाळीच नमाज अदा करून मुंबईभरातील मुस्लिम बांधवांनी एकमेकांना 'ईद मुबारक' म्हणत आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.

मस्जिद बंदर, भेंडी बाजार, बेहरामपाडा, डोंगरी, वांद्रे, कुर्ला, जोगेश्वरीसह शहरातील ठिकठिकाणच्या मशिदीत एकाचवेळी हजारहून अधिक मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.

रंगीबेरंगी नवीन कपडे, सुगंधी दरवळ, खमंग पदार्थ आणि शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या गर्दीने प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या घरातील वातावरण भारून गेले. ईदच्या सुटीनिमित्त फिरायला जाणे, नातेवाईकांना भेटण्याला बहुतेक कुटुंबांनी पसंती दिली.का साजरा होतो हा सण?

'रमजान'च्या पवित्र महिन्याच्या समाप्तीनंतर जवळपास ७० दिवसानंतर हा सण साजरा केला जातो. इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहिम आपला मुलगा हजरत इस्माईल याला याच दिवशी इश्वराच्या आदेशानुसार 'कुर्बान' करण्यासाठी घेऊन निघालेे होते. तेव्हा अल्लाहने त्यांच्या मुलाला जीवनदान दिले. या दिवसाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.


समर्पणाची भावना

'ईद उल अजहा' किंवा 'ईदे- अजहा' हा सण प्रामुख्याने 'बकरी ईद' म्हणून ओळखला जातो. हा सण मुस्लिम धर्मियांचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. मुस्लिम धर्मियांमध्ये एकूण तीन प्रकारे ईद साजरी केली जाते. त्यातील इतर दोन प्रकार म्हणजे ईदुलफित्र किंवा रमजान ईद आणि मिलादुन्नबी ईद. हे तीन्ही सण बंधुभाव, त्याग, समर्पण आणि मानवतेचा संदेश देतात.'नमकीन ईद'

'ईद उल अजहा' ला अनेक नावांनी ओळखले जाते. या ईदला 'नमकीन ईद' किंवा 'ईदे कुरबां' असेही म्हटले जाते. या दिवशी चटपटीत खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने 'नमकीन ईद' तसेच या सणाचा 'कुर्बानी'शी संबंध असल्याने ईदे कुरबां' म्हटले जाते.


कुर्बानी कशासाठी?

सर्वसामान्यपणे या सणाचा संबंध बकऱ्याशी लावला जातो, पण प्रत्यक्षात तसे नाही. 'बकर' या शब्दाचा अर्थ 'मोठा प्राणी' ज्याचा 'जिबह' म्हणजेच बळी दिला जातो, असा आहे. यातून 'बलिदान' अर्थात 'त्यागा'ची भावना अधोरेखीत केली जाते. अरबी भाषेत 'कर्ब' या शब्दाचा अर्थ अत्यंत जवळ असा होतो. म्हणजेच यावेळी ईश्वर व्यक्तीच्या सर्वात जवळ असतो. परंतु भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशात या शब्दाचा अपभ्रंश झाल्याने या सणाला 'बकरा ईद' असे म्हटले जाते.

या दिवशी कुर्बानीचा एक हिस्सा कुटुंबीयांसाठी, दुसरा हिस्सा नातेवाईकांसाठी आणि तिसरा हिस्सा गोरगरिबांसाठी देण्याची प्रथा आहे.

हिंदूधर्मीयांच्या दिनदर्शिकेत दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. त्यामुळे मुस्लिमधर्मीयांचा एक महिना अगोदर येतो. त्यामुळे २०१५ नंतर २०१६ आणि २०१७ अशी सलग तीन वर्षे गणेशोत्सवात बकरी ईद आहे. तर २०१८ मध्ये मात्र श्रावण महिन्यात बकरी ईद असेल.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement