Advertisement

ऊर्जा कपवर पुणे संघाचा ताबा


ऊर्जा कपवर पुणे संघाचा ताबा
SHARES

'ऊर्जा कप'च्या अंतिम सामन्यात पुणे डीएफए संघाने टायब्रेकरमध्ये कोल्हापूर डीएफए संघाचा 4-3 अशा फरकाने पराभव करत 'ऊर्जा कप'चा ताबा मिळवला. कुपरेज मैदानावर मंगळवारी रात्री ही चुरशीची लढत झाली. तसेच मुलींच्या गटातील अंतिम लढतीत मुंबई डीएफएने बाजी मारली. 'ऊर्जा कप' अंतर्गत 19 वर्षांखालील टॅलेंट गट स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. मुंबईसह महाराष्ट्रातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.

मुलांच्या गटात रंगलेला पुणे डीएफए आणि कोल्हापूर डीएफए हा सामना पूर्ण वेळेत शून्य गोल बरोबरीत सुटला. त्यामुळे दोन्ही संघांना 20 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. या अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांपैकी एकालाही गोल नोंदवता न आल्याने सामना टायब्रेकरमध्ये खेळवण्यात आला.


टायब्रेकरमध्ये पुणेकरांनी कोल्हापूरवर 4 गोल करुन वर्चस्व राखले. पुणे संघाच्या एड्विन फलेरिओ, विकी पुजारी, ख्रिस उन्नीथन आणि रेयान सचिन यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाला विजयी केले. आशिष अवतीचा एक गोल गोलपोस्टला लागल्याने तो हुकला. तर, कोल्हापूरकडून पवन माळी, शिवाजी शिंदे आणि प्रदीप पाटील यांना गोल करण्यात यश मिळाले. नितांत कर्णे आणि ऋतुराज संकल्प या दोघांना गोल करण्यात अपयश आल्याने त्यांच्या हातून सामना निसटला आणि कोल्हापूरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या गटात मुंबई डीएफए विरुध्द एसजीएफआयमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई डीएफएने विजेतेपद पटकावले. त्यांनी एसजीएफआयचा 3-2 ने पराभव केला. तसेच मुंबई डिएफए संघाची खेळाडू कॅरेन पेस हिने चमकदार कामगिरी करत तिन्ही गोल करुन संघाला एकहाती विजय मिळवून दिला. तर, एसजीएफआयच्या श्रुती लक्ष्मी व ममता आचार्य यांनी प्रत्येकी एक गोल केला.

यावेळी सिने अभिनेता रणबीर कपूर आणि अभिषेक बच्चन या दोघांनीही मैदानात उतरुन फुटबॉल खेळाडूंसोबत मैत्रीपूर्ण सामना खेळला.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा