Advertisement

मुंबईतील २४ शिक्षक, १० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईतील ज्या शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये एकूण २४ शिक्षक आणि १० शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील २४ शिक्षक, १० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ८ महिने शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. मात्र, २३ नोव्हेंबरपासून ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार, शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. यामध्ये मुंबईतील ज्या शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये एकूण २४ शिक्षक आणि १० शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. यामधील ३ शिक्षक हे महापालिका शिक्षण विभागातील आहेत, तर इतर मुंबईतील पश्चिम, उत्तर आणि दक्षिण विभागातील आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा या ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत ९वी ते १२वीच्या एकूण १८०२ शाळा असून, यामध्ये ७ लाख ५१ हजार २४२ विद्यार्थी शिकत आहेत. ९वी ते १२वीला शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या १९ हजार ४४२ असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ६ हजार ९ इतकी आहे. यामध्ये पश्चिम विभागातील ४०७२, उत्तर विभागातील २१२२ तर दक्षिण विभागातील १५२१ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली.

या ७७१५ शिक्षकांमध्ये २१ शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर २३२९ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांमध्ये १० कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. पालिका शिक्षण विभागामध्ये ११६१ शिक्षक ९वी ते १२वीच्या वर्गासाठी कार्यरत असून ७१३ शिक्षकांच्या चाचण्या पार पडण्यात आल्या आहेत. यामधील ३ शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते.

मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर या चाचण्यांना स्थगिती देण्यात आली. ज्या शिक्षक, शिक्षकेतरांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह असल्याचं प्रमाण नगण्य असलं तरी शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळं ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार असल्यानं शिक्षकांसाठी जारी करण्यात आलेला ५०% उपस्थितीचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय