महापालिका रूग्णालयात रक्त तपासताय, मग सावधान

 Mumbai
महापालिका रूग्णालयात रक्त तपासताय, मग सावधान

मुंबई- रूग्णांनो, महापालिकेच्या रूग्णालयात रक्त, लघवी, थुंकी वा इतर कोणत्याही प्रकारची तपासणी करत असाल तर सावधान. तुमचा रिपोर्ट खरंच बरोबर, योग्य येईल, याची काहाही शाश्वती नाही. ज्या व्यक्तिंकडून तुमच्या रक्ताच्या वा इतर प्रकारच्या तपासण्या केल्या जातायत ती व्यक्ति अधिकृत पॅथालॉजिस्ट असेलच याचा काही भरवसा नाही. कारण पालिकेच्या 16 पैकी आठ रूग्णालयांमध्ये पॅथालॉजिस्टच नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकाराखाली उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी याबाबत ‘मुंबई लाइव्ह’ला ही माहिती दिली आहे. रक्त, लघवी, थुंकी नव्हे तर मोठ्या आजारासंबंधीच्या तपासण्याही तंत्रज्ञ वा इतर व्यक्तिंकडून केल्या जात असल्याची बाबही यातून उघड झाली आहे.

कायद्यानुसार पॅथालॉजिस्टच पॅथालॉजी लॅब चालवू शकतात तर पॅथालॉजिस्टचीच सही रिपोर्टवर असणे बंधनकारक आहे. तर पॅथालॉजिस्टच्या उपस्थितीतच चाचण्या पार पडल्या पाहिजेत. मात्र, मुंबईसह राज्यात बोगस पॅथालॉजिस्टचा सुळसुळाट असून रूग्णांच्या जीवाशी हे बोगस पॅथालॉजिस्ट कसा खेळ करत आहेत ते सातत्याने पॅथालॉजिस्ट संघटनांनी समोर आणले आहे. मात्र तरी सरकार इतक्या गंभीर विषयावर मुग गिळून गप्प आहे. आता तर चक्क महापालिकेच्याच रूग्णालयांत कायदा धाब्यावर बसवला जात असून, महापालिका रूग्णालयच रूग्णांच्या जिवाशी खेळ करत असल्याचे समोर आले आहे. कोठारी यांनी महापालिकेच्या 16 रूग्णालयातील पॅथालॉजिस्टसंबंधीची आणि लॅबची माहिती माहिती अधिकाराखाली मागितली होती. त्यानुसार महापालिकेने 16 पैकी आठ रूग्णालयांमध्ये पॅथालॉजिस्ट नसून तंत्रज्ञच पॅथालॉजिस्टचे काम करत असल्याची माहिती दिली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत कोठारी यांनी आता याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीसह त्वरीत पॅथालॉजिस्टची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथालॉजिस्ट अॅंड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी आम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून पालिकेने पालिकेच्या रूग्णालयांची चौकशी करत पॅथालॉजिस्ट आहेत की नाहीत याची तपासणी करावी यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, पालिकेकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. दरम्यान, आता पालिकेच्या आठ रूग्णालयामध्ये पॅथालॉजिस्ट नाही हे उघड झाल्याने आता तरी महापालिका कारवाई करणार का हाच आमचा सवाल असल्याचंही कुलकर्णी यांना स्पष्ट केले आहे. तर, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही.

या रूग्णालयात पॅथालॉजिस्टचा पत्ता नाही 

ज्योतिबा फुले रूग्णालय, विक्रोळी
वीर सावरकर रूग्णालय, मुलुंड पुर्व
एम टी अग्रवाल रूग्णालय, मुलुंड पश्चिम
मुक्ताबाई रूग्णालय, घाटकोपर
शताब्दी रूग्णालय, गोवंडी
सावित्राबाई फुले रूग्णालय, बोरिवली
एम डब्ल्यू देसाई, मालाड
एस के पाटील रूग्णालय, मालाड

Loading Comments