राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी मदतीचं आवाहन केलं आहे. याला प्रतिसाद देत अनेकांनी भरघोस मदत केली आहे. आता अभिनेते आता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम या फाऊंडेशननेही यामध्ये मोठी मदत केली आहे. नाम फाऊंडेशनकडून मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्य निधीसाठी प्रत्येक 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. नाना पाटेकर यांनी ट्विट करीत आपण मदत करीत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून माननीय @OfficeofUT @CMOMaharashtra उद्धव ठाकरेजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ५० लाख रुपयांचं योगदान करत आहे. pic.twitter.com/ZlWliTc4rO
— Nana Patekar (@nanagpatekar) March 30, 2020
आतापर्यंत विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींपासून अगदी सर्वसामान्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला जितकं शक्य आहे तितकी मदत केली आहे. हळूहळू हा मदतीचा ओघ वाढत आहे. नाम फाऊंडेशनने मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्य निधीसाठी प्रत्येक 50 लाख रुपये अशी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.
नाना पाटेकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, या क्षणाला आपण सर्वांनी जात-धर्म विसरुन सरकारला सहकार्य करण्यासाठी पुढे यायला हवं. इतक्या मोठ्या संकटाशी सरकार एकटं लढू शकत नाही. यासाठी सर्वानी एकजूट होण्याची गरज आहे. नाम फाऊंडेशनकडून मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्य निधीसाठी प्रत्येक 50 लाख रुपये पाठविणार आहोत. कृपया घराबाहेर पडू नका. सध्या घराबाहेर न पडण हीच मोठी देशसेवा आहे. याशिवाय कोरोनाशी लढ्यात सहकार्य म्हणून मदत कराल अशी आशा आहे.
हेही वाचा -
‘रामायण’, ‘महाभारता’नंतर 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाऊनमुळं टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ