Advertisement

हातांच्या प्रत्यारोपणानंतर मोनिका मोरेला रुग्णालयातून डिस्चार्ज

मोनिकावर २८ आँगस्ट रोजी तब्बल १६ तास झालेल्या ऑपरेशद्वारे दोन्ही हातांचं यशस्वी प्रत्यारोपण झालं आहे.

हातांच्या प्रत्यारोपणानंतर मोनिका मोरेला रुग्णालयातून डिस्चार्ज
SHARES

कुर्ला इथं राहणाऱ्या २४ वर्षीय मोनिका मोरे हिला ४ आठवडयानंतर मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे. मोनिकावर २८ आँगस्ट रोजी तब्बल १६ तास झालेल्या ऑपरेशद्वारे दोन्ही हातांचं यशस्वी प्रत्यारोपण झालं आहे. आता तिच्यात खुप चांगली सुधारणा झाली आहे. सहा वर्षानंतर ती पुन्हा स्वांवलंबन जीवनाचा प्रयत्न करणार आहे. 

२०१४ मध्ये घाटकोपर इथल्या रेल्वे अपघातात मोनिकानं तिचे दोन्ही हात गमावले होते. दोन वर्षांपूर्वी तिनं मुंबईच्या ग्लोबल रूग्णालयात दोन्ही हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली. अनेक प्रसंग असे आले की त्यावेळी मोनिकाला अवयव दात्यांकडून हात उपलब्ध होऊ शकले असते. पण मेंदू मृत व्यक्तिच्या कुंटूंबियाकडून हात दान करण्यासाठी कोणी तयार होत नसल्यानं ही शस्त्रक्रिया रखडली होती.

परंतु, चेन्नईतील ३२ वर्षीय मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानामुळे मोनिकाला नवीन हात मिळाले आहे. चॉर्टड विमानानं हे हात मुंबईत आणण्यात आले होते. रात्री उशीरा या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरूवात करण्यात आली होती. साधारणतः १६ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. आता ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मोनिकाला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले की, ‘‘हात मिळत नसल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून मोनिकाच्या दोन्ही हातांचं प्रत्यारोपण रखडलं होतं. पण आता हात मिळाल्यानं तिच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. हातांचं प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते.”

शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात एका वेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. तसंच तिची काळजी घेण्यासाठी विलगीकरणासह एका नर्सची नियुक्ती करण्यात आली होती. तिच्या दोन्ही हातांना नियमित मलमपट्टी करण्यात आली. रूग्ण प्रत्यारोपणाच्या तिस-या दिवशी ती आपल्या खांद्याचा आधार घेऊन चालू आणि बसू लागली. याशिवाय दिवसातून दोनदा तिला फिजिओथेरपी दिली जात होती. हातांच्या हाडांना आधार मिळावा, यासाठी हाताच्या कोपऱ्यापर्यंत प्लास्टर करण्यात आला आहे.

डॉ.सातभाई पुढे म्हणाले, “येत्या काही आठवड्यांत तिला कोपर हलवायला सांगितले जाईल. याशिवाय हात आणि बोटांनी ३-४ महिन्यांनंतर हालचाल सुरू होणे अपेक्षित आहे. तिच्या हाताचे स्नायूतील टिश्य आणि हाड तोपर्यत बरे होतील. रूग्णाला या काळात आपल्या दैनंदिन कार्य़ासाठी मदत घ्यावी लागेल. पण, एकदा तिच्या हातांची हालचाल आणि व्यायाम आणि फिजिओथेरपीव्दारे ती लवकरच अधिक अधिक स्वावलंबी होईल.

मोनिका मोरे म्हणाली, “मला नवीन हात मिळतील, असा माझा ठाम विश्वास होता. आता माझं स्वप्न पूर्ण झाल्यानं मी खूप आनंदी आहे. हात गमावल्यानं कोणाच्याही लग्नात मला हाताला मेहंदी लावता येत नव्हती. पण आता मी पुन्हा मेहंदी लावू शकेन. याशिवाय, चित्र काढणे, आंघोळ करणे, स्वयंपाक आणि केस बांधणे ही काम मी स्वतः करु शकेन, याचा मला आनंद आहे. मला मिळालेल्या या नवीन आयुष्यासाठी माझे कुटुंबीय, अवयवदाता आणि डाँक्टरांचे मी आभार मानते. ”

ग्लोबल रुग्णालयातील (मुंबई) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विवेक तलौलीकर म्हणाले की, "चेन्नईमधील एका ब्रेनडेड व्यक्तीने हात दान केल्याने मोनिकाला नवीन आयुष्य मिळाले आहे. महाराष्ट्रातील ही पहिली यशस्वी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे."हेही वाचा

स्वयंसेवकांचा लस चाचणीवेळी मृत्यू झाल्यास मिळणार १ कोटी

मुंबईत पुन्हा रक्ताचा तुटवडा

संबंधित विषय