Advertisement

भाभा, शताब्दी आणि राजावाडीत सीटी स्कॅनसह एमआरआयची सुविधा


भाभा, शताब्दी आणि राजावाडीत सीटी स्कॅनसह एमआरआयची सुविधा
SHARES

मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर 2 ठिकाणी सीटीस्कॅन सुविधा केंद्र आणि एका ठिकाणी एमआरआय सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. या संदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संबंधित संस्था आणि कंपन्यांना 24 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली आहे.

महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता आणखी दोन ठिकाणी सीटीस्कॅन सुविधा आणि एका रुग्णालयात एमआरआय सुविधा देण्यात येणार आहे. कुर्ल्यातील खान बहादूर भाभा रुग्णालय आणि गोवंडी परिसरातील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय या दोन रुग्णालयांत प्रत्येकी एक सीटीस्कॅन मशीन आणि घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात एक एमआरआय मशीन पुरविले जाणार आहे.दोन्ही सीटी स्कॅन सुविधा केंद्रामध्ये दररोज साधारणपणे 80 तपासण्या होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दर महिन्याला जवळपास 2 हजार 400 गरजू रुग्णांना सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच प्रस्तावित करण्यात आलेल्या एमआरआय सुविधा केंद्राद्वारे दररोज 15 एमआरआय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे दर महिन्याला साधारणपणे 450 गरजू रुग्णांना या सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत.

महापालिकेच्या तीनही रुग्णालयांमध्ये वर्षाला 1 रुपया भाडेपट्टादराने साधारणपणे 1 हजार चौरस फुटांची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जागेत आवश्यक ती यंत्रसामुग्री बसवणे, तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करणे, यासह गरजू रुग्णांना महापालिकेच्याच दरात सीटी स्कॅन आणि एमआरआय सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. सध्या महापालिकेमध्ये एमआरआय सुविधेसाठी 2 हजार 500, तर सीटी स्कॅनसाठी 1 हजार 200 एवढे शुल्क आकारले जाते. मात्र सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर निविदा दिल्यानंतर सर्वात कमी रक्कम आकारून रुग्णांना या सुविधा देण्यात येतील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा