Advertisement

बाइक अॅम्ब्युलन्समुळे मुंबईत 232 रुग्णांना आपत्कालीन सेवा


बाइक अॅम्ब्युलन्समुळे मुंबईत 232 रुग्णांना आपत्कालीन सेवा
SHARES
Advertisement

गरजू आणि गरीब रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आरोग्य विभागाने मुंबईत शिवआरोग्य बाईक अॅम्ब्युलन्स हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईतील आतापर्यंत 232 रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

2 ऑगस्टला ही सेवा मुंबईभर सुरू करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत या सेवेमुळे महिन्याभरात 232 रुग्णांवर तत्काळ सेवा देण्यात आली आहे. या प्रकल्पाला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याचेही डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

मुंबई शहरात अडचणीत सापडलेल्या रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरली. 232 पैकी प्रामुख्याने 32 बेशुद्ध रुग्णांवर वेळेवर उपचार करण्यात आले. त्याबरोबरच तापाचे 16, श्वास घेण्यात अडचण येत असलेले 25, हृदयविकाराचा त्रास जाणवणारे 24 तर पोटदुखीच्या 14 रुग्णांना वेळीच बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून उपचार देण्यात आले.

डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र

मुंबईतील दाटीवाटीच्या परिसरात किंवा चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये ही सेवा सोयीस्कर ठरत आहे. चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 40, गोरेगाव फिल्मसिटी भागातून 37, चिता कॅम्प भागातून 30, अशोक टेकडी भागातून 26, नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 24 अशा प्रकारे 232 रुग्णांना सेवा देण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.

मुंबईत सध्या दहा ठिकाणी या बाइक अॅम्ब्युलन्सची सेवा कार्यान्वित आहे. एखाद्या रुग्णाला आपात्कालीन सेवा हवी असल्यास त्याने 108 क्रमांकाला संपर्क केला तर ही सेवा त्याला तत्काळ उपलब्ध होऊ शकते.


त्या ठिकाणांची यादी खालीलप्रमाणे-

अशोक टेकडी, जमिल नगर, भांडुप (प)
चिता कॅम्प प्रसूती गृह, मानखुर्द
धारावी पोलीस स्थानक
नागपाडा पोलीस स्थानक
कुरार पोलीस स्थानक, अप्पा पाडा, मालाड (पू)
चारकोप पोलीस स्थानक
गोरेगाव चित्रनगरी
खार दांडा पोलीस स्थानक
अप्पर आयुक्त पोलीस स्थानक, ठाकूर व्हिलेज
मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस


हेही वाचा -

बाईक अॅम्ब्युलन्स सुसाट! 72 तासांत 35 रुग्णांवर उपचार!

मुंबईत ‘मोटार बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा सुरू
संबंधित विषय
Advertisement