Advertisement

महापालिकेचं 'मिशन इंद्रधनुष्य'!


महापालिकेचं 'मिशन इंद्रधनुष्य'!
SHARES

महानगरपालिकेनं एक नवं मिशन हाती घेतलंय. 'मिशन इंद्रधनुष्य' असं या मिशनचं नाव आहे. ऐकायला जरी सांस्कृतिक वाटत असलं तरी या मोहिमेमुळे आपल्या महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ व्हायला मदत होणार आहे. लसीकरणापासून पूर्णत: आणि अंशत: वंचित असलेली 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालकं आणि गरोदर माता यांचे 2020 पर्यंत पूर्णत: लसीकरण करण्यासाठी भारत सरकारने 25 डिसेंबर 2014 पासून 'मिशन इंद्रधनुष्य' या नावाने विशेष लसीकरण मोहिम सुरू केली आहे. बालकांमधील मृत्यू आणि आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे नवजात बालकांना आणि मातेला होणाऱ्या आजारांना प्रतिबंध घालायला मदत होते. महापालिकेनं हाती घेतलेल्या या 'मिशन इंद्रधनुष्य' मोहिमेमुळे मागासलेल्या भागातील मुलांना लसीकरण द्यायला फार मदत होणार आहे. 'मिशन इंद्रधनुष्य' कार्यक्रमांतर्गत या मागासलेल्या भागांमध्ये विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येते. केंद्र शासनाने 'मिशन इंद्रधनुष्य'अंतर्गत एप्रिल 2017 पासून चौथ्या टप्प्यामध्ये चार मोहिमांचे आयोजन केले आहे. चौथ्या टप्प्यांंतर्गत ही मोहीम एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यांत प्रत्येकी सात दिवस राबवण्यात येणार आहे. चार टप्प्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेचा खर्च 99 लाख एवढा असणार आहे. या लसीकरण योजनेसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही.

एप्रिल महिन्यात राबवण्यात आलेल्या पहिल्या मोहिमेत 1,506 मुलांचं लसीकरण करण्यात आलं. मे महिन्यात 7 ते 16 या कालावधीत दुसऱ्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत महानगरपालिका आरोग्य केंद्रातर्फे शहरी भागातील झोपडपट्टी, बांधकामे, अतिदुर्गम भागांमध्ये 564 विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या जाहिरातींसाठी हॅंडबिल्स, पोस्टर्स, बॅनर्स यांची खास व्यवस्था करण्यात आली आहे.

मालवणी म्हणजेच पी उत्तर वॉर्ड, एफ उत्तर, के पश्चिम, कुर्ला म्हणजेच एल वॉर्ड, गोवंडी म्हणजेच एम पूर्व वॉर्ड या झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचं काम केलं जाणार आहे. 2020 पर्यंत डांग्या खोकला, धनुर्वात, बालपणातील क्षयरोग, पोलिओ, हेपेटायटिस बी आणि गोवर अशा अनेक आजारांपासून भारताला मुक्त करण्याचं उद्दिष्ट मिशन इंद्रधनुष्य या मोहिमेचं आहे. लसीकरण नसण्याचं प्रमाण तेथे जास्त आढळते जेथे स्थलांतरित लोकसंख्या जास्त आहे. बांधकाम सुरू असलेल्या जागा, जंगल, अविकसित आणि वेगळे केलेले क्षेत्र आहेत.

मिशन इंद्रधनुष्य हा एक महापालिकेकडून घेण्यात आलेला पुढाकार आहे, ज्याचा आता चौथा टप्पा आहे. सरकारने केलेल्या नियमानुसार बालकांचं लसीकरण करणे किंवा त्यांना डोस देणे गरजेचे आहे. जेव्हा बालकाचे पूर्णपणे लसीकरण होते तेव्हाच बालक सुदृढ होते. तसंच जी मुलं या लसीकरण प्रक्रियेतून निसटली आहेत त्या मुलांसाठी ही खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्थलांतर हे लसीकरण न होण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झालेल्या मुलांचं लसीकरण होईलच असं नाही. त्यामुळे या मुलांना हेपेटायटिस बी सारखे आजार होतात. म्हणून अशा मुलांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या मोहिमेचे चार टप्पे करण्यात आले आहे. जेणेकरून एका तरी टप्प्यात अजिबात लसीकरण न झालेल्या मुलांचं लसीकरण होऊ शकते.

पद्मजा केसकर, महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा