Advertisement

कांदिवलीत बनावट लस मिळालेल्या ३९० नागरिकांचंही लसीकरण होणार

मुंबईत आढळलेल्या ९ बनावट लस प्रकरणातील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलीसांकडून महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे.

कांदिवलीत बनावट लस मिळालेल्या ३९० नागरिकांचंही लसीकरण होणार
SHARES

कांदिवलीमध्ये (पश्चिम) हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट लसीकरण होऊन जवळपास ३९० नागरिकांची फसवणूक झाली. त्यानंतर आता या नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकृत लस दिली जाणार आहे.

त्यासाठी शनिवारी (२४ जुलै २०२१) रोजी कांदिवलीमध्ये (पश्चिम) महावीर नगर परिसरातील अॅमिनिटी मार्केट महानगरपालिका लसीकरण केंद्रावर लसीकरणाचं नियोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबईत आढळलेल्या ९ बनावट लस प्रकरणातील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलीसांकडून महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे. या नागरिकांना योग्यरित्या अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक ती सर्व पडताळणी करुन कार्यवाही सुरू आहे.

कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलानं खासगीरित्या लसीकरण दिनांक ३० मे २०२१ रोजी आयोजित केलं होतं. मात्र, सदर लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीनं झाल्याची बाब नंतर उघडकीस आली. त्याबाबत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चौकशी देखील सुरू केली.

या प्रकरणी धागेदोरे हाती लागल्यानंतर अशाच रितीनं एकूण ९ बनावट आणि अनधिकृत लसीकरणाचे प्रकार घडल्याचं आणि त्यात अनेक नागरिकांना बनावट / अनधिकृत लस दिल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात हाती आली.

सदर लाभार्थ्यांना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तर, काहींची कोविन पोर्टलवर नोंद केल्याचं देखील निदर्शनास आलं आहे. अनधिकृत आणि अनुचित पद्धतीनं करण्यात आलेल्या या सर्व गोष्टींची पोलीसांनी सखोल चौकशी केली आहे.

पोलीस तपासानुसार ज्या नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याचा संशय आहे, त्या नागरिकांची यादी पोलीसांनी महानगरपालिका प्रशासनाकडे सोपवली आहे. कोविन संकेत स्थळावर भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे या नागरिकांची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून पडताळण्यात येत आहे.

पडताळणीअंती आणि पोलीस तपासानुसार, खरी लस मिळालेल्या नागरिकांना विहित नियमानुसार कालावधी पूर्ण होताच (कोव्हॅक्सीन असल्यास २८ दिवसांनंतर / कोविशील्ड असल्यास ८४ दिवसांनंतर) दुसरा डोस देण्यात येईल. तर, ज्यांना बनावट लस देण्यात आली, त्यांना योग्य कार्यवाही करुन अधिकृत लस देण्यात येणार आहे.



हेही वाचा

तिसरी लाट थोपवण्यासाठी नवी मुंबईत टारगेटेड टेस्टींग

मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा