Advertisement

रेल्वेचा बडगा! ८ वन रूपी क्लिनिकचं शटर डाऊन

नियमानुसार क्लिनिकमध्ये २४ तास एमबीबीएस डाॅक्टर नसल्याचं कारण देत रेल्वे प्रशासनानं डाॅ. राहुल घुले यांच्या ६ वन रूपी क्लिनिकला, तर एम्स हाॅस्पीटलच्या २ वन रूपी क्लिनिकला नोटीसा पाठवून क्लिनिक बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारपासून ८ वन रूपी क्लिनिक बंद झाली आहेत.

रेल्वेचा बडगा! ८ वन रूपी क्लिनिकचं शटर डाऊन
SHARES

रेल्वे प्रशासनानं मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील एक-दोन नव्हे तर ८ वन रूपी क्लिनिकचं शटर डाऊन केलं आहे. त्यामुळे वन रूपी क्लिनिक चालवणाऱ्या डाॅक्टरांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं असून रूग्णांनाही त्याचा फटका बसू लागला आहे.


रेल्वेची कारवाई का?

नियमानुसार क्लिनिकमध्ये २४ तास एमबीबीएस डाॅक्टर नसल्याचं कारण देत रेल्वे प्रशासनानं डाॅ. राहुल घुले यांच्या ६ वन रूपी क्लिनिकला, तर एम्स हाॅस्पीटलच्या २ वन रूपी क्लिनिकला नोटीसा पाठवून क्लिनिक बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारपासून ८ वन रूपी क्लिनिक बंद झाली आहेत.


निर्णय कितपत योग्य?

एकीकडे रेल्वे स्थानकांवरील अपघातांची संख्या वाढत असताना आणि तात्काळ उपचार मिळत नसल्यानं रूग्णांचा मृत्यू होत असताना वन रूपी क्लिनिक बंद करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे. तर, दुसरीकडे डाॅ. घुले आणि एम्सच्या डाॅ. चौघुले यांनी ही क्लिनिक पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा सुरू केला आहे.


कुठे होती क्लिनिक्स?

डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकावर एम्सच्या माध्यमातून वन रूपी क्लिनिकची सेवा दिली जात होती. तर भायखळा, दादर, वडाळा, माटुंगा, कुर्ला, टिटावाळा, मुंब्रा, गोवंडी, घाटकोपर, वाशी, मुलुंड आणि ठाणे अशा १२ स्थानकावर डाॅ. घुले वन रूपी क्लिनिकची सेवा देत होते.


किती रुग्णांवर उपचार?

डाॅ. घुले यांच्या वन रूपी क्लिनिकच्या माध्यमातून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रूग्णांवर उपचार केले आहेत. चांगल्या सेवेमुळे रेल्वेच्या सर्व स्थानकांवर वन रूपी क्लिनिकची सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी होत असताना ८ वन रूपी क्लिनिक बंद करण्यात आली आहे. याचा रूग्णांना फटका बसताना दिसत आहे. डोंबिवली, कल्याण, कुर्ला, घाटकोपर, वडाळा, गोवंडी, वाशी आणि मुलुंड अशी बंद झालेल्या क्लिनिकची नावं आहेत.


पुन्हा पाठपुरावा सुरू

क्लिनिकमध्ये २४ तास एमबीबीएस डाॅक्टर उपलब्ध करून देण्याच्या नियमांचं पालन करू, लवकरात लवकर २४ तास एमबीबीएस डाॅक्टरांची नियुक्ती करू, असं म्हणत रेल्वे प्रशासनाकडे क्लिनिक पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याची माहिती डाॅ. घुले यांनी मुंबई लाइव्हला दिली.


फार्मसीच्या मागणीकडे कानाडोळा

तर, रूग्णसेवा हेच सामाजिक उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवत मोठा आर्थिक तोटा सहन करत क्लिनिक चालवत असताना, रूग्णसेवेत कधीही कोणतेही चूक केली नसताना रेल्वेनं क्लिनिक बंद केल्याबद्दल डाॅ. शितल चौगुले यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. ''आम्हाला २४ तास एमबीबीएस डाॅक्टर नियुक्त करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यानं आम्ही रेल्वेकडे फार्मसी सुरू करण्याची परवानगी मागत होतो. या मागणीकडं कानाडोळा करत आम्हाला कोणताही वेळ न देता रेल्वेनं अचानक क्लिनिक बंद केलं.'' असंही डाॅ. चौगुले यांनी स्पष्ट केलं.

ही दोन्ही क्लिनिक पुन्हा सुरू व्हावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता डाॅ. घुले आणि एम्स हाॅस्पीटलच्या डाॅक्टरांच्या प्रयत्नांना यश येतं का आणि रेल्वेकडून पुन्हा या ८ क्लिनिक सुरू करत रूग्णांना दिलासा दिला जातो का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.हेही वाचा-

वन रूपी क्लिनिक अडचणीत, कुर्ला, घाटकोपरचे क्लिनिक बंद करण्याचे आदेश

५० हजार रूग्ण, १२ स्थानकं आणि वन रुपी क्लिनिकची वर्षपूर्ती!Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा