Advertisement

वन रूपी क्लिनिक अडचणीत, कुर्ला, घाटकोपरचे क्लिनिक बंद करण्याचे आदेश

एमबीबीएस डाॅक्टर २४ तास सेवेत नसल्याचं म्हणतं रेल्वे प्रशासनानं वनरूपी क्लिनिकला १ लाखांचा दंड ठोठावला आहे. एवढं कमी की काय, घाटकोपर आणि कुर्ला रेल्वे स्थानकावरील वनरूपी क्लिनिकचं शटरडाऊन करण्याचे आदेशही रेल्वे प्रशासनानं दिले आहेत.

वन रूपी क्लिनिक अडचणीत, कुर्ला, घाटकोपरचे क्लिनिक बंद करण्याचे आदेश
SHARES

लोकल प्रवाशांसह मुंबईकरांसाठी वरदान ठरत असलेलं वनरूपी क्लिनिक अडचणीत आलं आहे. एमबीबीएस डाॅक्टर २४ तास सेवेत नसल्याचं म्हणतं रेल्वे प्रशासनानं वनरूपी क्लिनिकला १ लाखांचा दंड ठोठावला आहे. एवढं कमी की काय, घाटकोपर आणि कुर्ला रेल्वे स्थानकावरील वनरूपी क्लिनिकचं शटरडाऊन करण्याचे आदेशही रेल्वे प्रशासनानं दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दोन्ही क्लिनिक बंद होणार असून त्याचा फटका आता प्रवाशांना-रूग्णांना बसणार आहे.


सर्वाधिक सेवा कुर्ल्यातच

कुर्ला रेल्वे स्थानकावरच सर्वाधिक अपघात होत असून अपघातात बळी जाणाऱ्याची संख्याही मोठी आहे. घाटकोपरमध्येही रूग्णांची संख्याही बरीच मोठी आहे. असं असताना या दोन्ही ठिकाणची वनरूपी क्लिनिक बंद होणार असून रेल्वेच्या या निर्णयावर वनरूपी क्लिनिकने नाराजी व्यक्त केली आहे.


उपोषणाला बसणार

या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी, १५ जूनला वनरूपी क्लिनिकचे डाॅक्टर आणि कर्मचारी ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफाॅर्म क्रमांक २ वर लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याची माहिती वनरूपी क्लिनिकचे प्रमुख डाॅ. राहुल घुले यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


क्लिनिक सुरू करण्याचं कारण काय?

रेल्वे स्थानकावर अपघात झाल्यानंतर केवळ तात्काळ उपचार मिळत नसल्यानं अपघातग्रस्त व्यक्तींचा मृत्यू होतो. हीच महत्त्वाची बाब लक्षात घेत डाॅ. घुले यांनी रेल्वे स्थानकावर अगदी स्वस्तात उपचार मिळावेत यासाठी वनरूपी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी मुंबईतील १२ रेल्वे स्थानकावर वनरूपी क्लिनिक्स सुरू करण्यात आली.


रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अवघ्या एक रुपयांत उपचार मिळत असल्याने वनरूपी क्लिनिकला रूग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वनरूपी क्लिनिकच्या माध्यमातून तात्काळ उपचार मिळाल्यानं कित्येक जणांचे प्राण वाचवले असून इथं आतापर्यंत ४ प्रसुतीही झाल्या आहेत. वनरूपी क्लिनिकला मिळणारा प्रतिसाद पाहता इतर रेल्वे स्थानकांवरही वनरूपी क्लिनिक सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.


राजकीय दबाव

असं असताना सुरू असलेली २ वनरूपी क्लिनिक बंद करण्यासाठी डाॅ. घुले यांच्यावर राजकीय दबाव येत आहे. आहेत. साधारणत: २ महिन्यांपूर्वी राजकीय दबाव आणत वनरूपी क्लिनिकच्या सेवेत अडचणी आणण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यावेळी डाॅ. घुले यांनी रेल्वेला पत्र लिहित याबाबत कळवलं होते.


रेल्वेने आकारला दंड

असं असताना आता रेल्वेनं डाॅ. घुले यांना पत्र पाठवत कुर्ला आणि घाटकोपर स्थानकावरील वनरूपी क्लिनिक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रानुसार वनरूपी क्लिनिकमध्ये २४ तास एमबीबीएस डाॅक्टर असणं बंधनकारक अाहे. पण वनरूपी क्लिनिकमध्ये रात्रीच्या वेळेस एमबीबीएस डाॅक्टर नसल्यानं हा नियमांचा भंग आहे. त्यामुळं रेल्वेनं वनरूपी क्लिनिकला १ लाखांचा दंड ठोठावत हे दोन्ही क्लिनिक बंद करण्याचे आदेश दिले आहेत.


चॅरिटेबल क्लिनिक असूनही...

कुर्ला आणि घाटकोपरमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत एमबीबीएस डाॅक्टर असतात. रात्रीच्या वेळेस मात्र बीएएमएस डाॅक्टर सेवा देतात. डाॅ. घुले यांच्या म्हणण्यानुसार वनरूपी क्लिनिक हे चॅरिटेबल क्लिनिक असून रात्रीच्या वेळेस एमबीबीएस डाॅक्टर उपलब्ध होत नाहीत. डाॅक्टरांना राज्य सरकारनं बाॅण्ड बंधनकारक केल्यानं डाॅक्टर उपलब्ध होत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर रेल्वेच्या या कारवाईचा निषेधही केला आहे.हेही वाचा-

'वन रुपी'चं महिलांना गिफ्ट, २०० रुपयांत वैद्यकीय तपासणी सुविधा

५० हजार रूग्ण, १२ स्थानकं आणि वन रुपी क्लिनिकची वर्षपूर्ती!

धावत्या ट्रेनमध्ये प्रसूतीकळा, वन रूपी क्लनिकमध्ये बाळाचा जन्मRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा