मुंबईत चिकूनगुनियाचे चार रुग्ण

 Pali Hill
मुंबईत चिकूनगुनियाचे चार रुग्ण

मुंबई - मुंबईकर तापाने फणफणले असून डेंग्यू, मलेरिया, लेप्टोसारख्या आजारांची साथही जोरात सुरू आहे. आता या साथीच्या आजारात चिकूनगुनियाचाही शिरकाव झालाय. तब्बल दोन वर्षानंतर मुंबईत चिकुनगुनियाचे 4 रूग्ण, तर 20 संशयित रूग्ण आढळले आहेत. पालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार जी नार्थ परिसरात 3 तर एम साऊथ परिसरात 1 असे चार रूग्ण आढळले आहेत. तर संशयित रूग्णांचा आकडा 20 आहे. चिकूनगुनियाचीही साथ आल्याने आता मुंबईकरांनी सावध होण्याची गरज असून घरात डास होऊ नये, याची योग्य ती काळजी नागरिकांनी घ्यावी, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय.

ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि त्वचेवर पुरळ उठणे, अशी या आजाराची लक्षणं असून तीन दिवसांत ताप उतरला नाही, तर त्वरीत चिकुनगुनियाची तपासणी करून घेण्याचंही आवाहन पालिकेनं केलंय. चिकुनगुनियाचे रूग्ण आढळल्याबरोबर पालिकेच्या आरोग्य विभागाने 19 परिसरांची तर 1,091 घरांची तपासणी केली असून धुरफवारणीच्या मोहिमेलाही वेग दिलाय. तर डेंग्यूच्या रूग्णांची संख्याही वाढतीच असल्याचं या अहवालातून दिसतंय.

1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी

तापाचे रूग्ण-5798

मलेरिया-238

डेंग्यू-102

लेप्टो-18

चिकुनगुनिया-4

संशयित डेंग्यू-1813

संशयित लेप्टो-96

संशयित चिकुनगुनिया-20

Loading Comments