केईएम, शीव, नायरमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर

 Pali Hill
केईएम, शीव, नायरमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर

मुंबई - महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील ऑपरेशन थिएटर अद्ययावत करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. त्यानुसार केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांतल्या ऑपरेशन थिएटरचे रुपांतर मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये होणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला गुरुवारी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी बोलावलेल्या विशेष स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली.

यानुसार केईएममधील 5 तसंच शीव आणि नायरमधील प्रत्येकी दोन ऑपरेशन थिएटर मॉड्युलर होतील. त्यासाठी 29 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महत्त्वाच्या, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला संसर्ग होऊ नये, अशा प्रकारची रचना असलेलं ऑपरेशन थिएटर म्हणजे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर. त्यानुसार स्टीलच्या अँटी बॅक्टेरिया, अॅण्टी फंगल भिंती, स्वयंचलित दरवाजे, लॅमिनेटेड फ्लोरिंग असं हे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त कुंदन यांनी दिली. मॉड्युलर ऑपरेशन थिएटरबरोबरच रुग्णालयांसाठी ऑक्सिजन आणि इतर आवश्यक वायूंचा पुरवठा करण्यासाठी 19 कोटींच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.

वैद्यकीय सेवांबाबत महापालिकेची हलगर्जी

रुग्णालयांना लागणाऱ्या वायूंचा पुरवठा करण्याबाबतचं कंत्राट जानेवारी 2017मध्ये संपतं आहे. हा पुरवठा ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्यानं कंत्राट संपण्याआधीच नव्या कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं होतं. त्यातही महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारीत लागू होणार असल्याचं माहिती असल्यानं महापालिकेनं अधिक घाई करणं गरजेचं होतं. पण महापालिकेनं ही प्रक्रिया सुरूच केली नव्हती. त्यामुळेच एेनवेळी पालिकेला तातडीची बैठक बोलावून प्रस्ताव मंजूर करून घेण्याची वेळ आल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती.

Loading Comments