महाराष्ट्र सरकारने कोविशील्ड लसींकरीता सीरम इन्स्टिट्युटकडे विचारणा केली असता २० मे पर्यंतचा स्टाॅक केंद्रासाठी बुक असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे महाराष्ट्राला लसी नेमक्या कधी मिळणार? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.
कोरोना विषाणू (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस विकत घेण्यास राज्य सरकारांना परवानगी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रानेही लसीकरणाची तयारी पूर्ण केलेली असली, तर लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे या मोहिमेला खिळ बसत आहे.
लस उत्पादक कंपन्यांना एकूण उत्पादनापैकी ५० टक्के साठा केंद्राला आणि उर्वरीत ५० टक्के साठा राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना विकण्याची मुभा देण्यात आलेली आहे. सध्या देशात केवळ दोनच लस उत्पादक कंपन्या आहेत. यामध्ये भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड या लसींचा समावेश आहे.
हेही वाचा- मुंबई महापालिकेच्या एफडी मोडा, मोफत लसीकरणासाठी शिवसेना नेत्याची शक्कल
If Serum tells @OfficeofUT ji that it can not supply vaccine till 20th May as all stock is booked by Modi govt. It has put vaccination for age group 18-44 under question mark We can't simply discuss lack of vaccines after so many mnths of corona.Modi ji, Whr is ur strategy?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 27, 2021
येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही लसीकरणासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारने घेतलेली असून त्यासाठी तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र सध्याच्या स्थितीत अपुऱ्या लशींच्या साठ्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करतानाच असंख्य अडचणी येत असताना त्यात १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करायचं कसं? त्यासाठ लस आणायची कशी असा प्रश्न राज्य सरकारला पडला आहे.
लस पुरवठ्यासाठी राज्य सरकारने दोन्ही कंपन्यांना पत्रं लिहिलेली असून २० मेपर्यंत कोविशील्डचा स्टाॅक केंद्रासाठी बुक असल्याचं सीरमने सांगितलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सचिन सावंत म्हणाले की, अपुऱ्या लशींमुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस कशी द्यायची हा प्रश्न आहे. कोरोनाच्या इतक्या महिन्याच्या कालावधीत आपण लसीच्या तुटवड्याबद्दल साधी चर्चा करू शकत नाही. मोदीजी, तुमची रणनीती कुठे आहे?
मोदी सरकारने २ कंपन्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा आणल्या आहेत. आता राज्य सरकारने लस खरेदी करून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस द्यावी असं म्हटलं जातं. ४५ वयोगटावरील नागरिकांबाबत केंद्र सरकार काळजी घेईल. संपूर्ण देशभरात लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत तारीख सांगू शकता का? असा प्रश्नही सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं आहे.
(congress spokesperson sachin sawant ask pm modi when maharashtra will get covid 19 vaccine)