Advertisement

'स्पुटनिक’साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत महापालिकेची चर्चा सुरु

'स्पुटनिक’ ही कोरोनावर ९१ टक्के प्रभावी असल्यानं महापालिका आता 'स्पुटनिक'साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत चर्चा करत आहे.

'स्पुटनिक’साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत महापालिकेची चर्चा सुरु
SHARES

कोरोनवर (coronavirus) प्रभावी औषध म्हणून सध्या लसीकरण केलं जातं आहे. यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे. अशातच 'स्पुटनिक’ ही कोरोनावर ९१ टक्के प्रभावी असल्यानं महापालिका आता 'स्पुटनिक'साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत चर्चा करत आहे. विशेष म्हणजे ग्लोबल टेंडर रद्द झालं तरी मुंबईला लस मिळणार आहे.

मुंबई महापालिकेने (bmc) कोरोना लसींसाठी काढलेलं ग्लोबल टेंडर निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या ९ कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र ठरली नसल्यानं हे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. असं असलं तरी स्पुटनिक या रशियाच्या लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर १२ मे रोजी स्वारस्य अभिव्यक्ती प्रकाशित केली. त्याला प्रतिसाद देणाऱ्या संभाव्य पुरवठादारांना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला २५ मेपर्यंत आणि दुसऱ्यावेळी १ जूनपर्यंत अशी दोनवेळा मुदतवाढ दिली. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देऊन दूरदृश्य प्रणालीद्वारे सातत्याने चर्चादेखील केली, अशी माहितीही महापालिकेनं दिली आहे.

जून अखेरिस स्पुटनिक लस मिळणार

मुंबई महापालिका (bmc) प्रशासनाने कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. प्रशासनाकडून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी स्पुटनिक लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज चर्चा केली. त्यानुसार, प्रायोगिक तत्वावर स्पुटनिक लसीचा काही प्रमाणात साठा बृहन्मुंबई महानगरपालिकेला जून २०२१ अखेरपर्यंत देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दर्शविली आहे.

स्पुटनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येईल. तसेच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत स्पुटनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबतही रेड्डीज लॅबोरेटरीजकडे विचारणा करण्यात आली आहे. यानुसार येत्या ८ ते १० दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत चर्चा केली जाणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा