मुंबईत गतवर्षी कोरोनानं हातपाय पसरण्यास सुरूवात केली. सुरूवातील मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला धारावी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. त्यानंतर महापालिकेनं सोयीसुविधा व आरोग्यव्यवस्था उपलब्ध करून धारावीला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढलं. कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न सहाव्यांदा यशस्वी ठरला आहे.
आशियातील या सर्वांत मोठ्या झोपडपट्टी भागातून मंगळवारी कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तर माहीममध्ये दुसऱ्यांदा शून्य स्कोअर आहे. धारावीत सध्या १६ तर माहीममध्ये ११७ सक्रिय रुग्ण आहेत. एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर दाटीवाटीनं वसलेल्या धारावीमध्ये प्रसार वाढण्याचा धोका होता. मात्र, हॉटस्पॉट ठरलेला हा विभाग कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिकेला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
या प्रयत्नांना यश येऊन २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा धारावीत एकही बाधित रुग्ण सापडला नाही. त्यानंतर २२, २६, २७ आणि ३१ जानेवारीला एकही बाधित रुग्ण सापडला नाही. तर मंगळवारी धारावीत सहाव्यांदा एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, माहीममध्ये दुसऱ्यांदा कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तर दादरमध्ये सात बाधित रुग्ण सापडले आहेत.
हेही वाचा -
मध्य व पश्चिम मार्गावर एका दिवसात १ लाख पासची विक्री
लोकल सेवेच्या वेळेतील बदलासाठी पाठपुरावा करू - राजेश टोपे