Advertisement

अग्निशमन दलातील ४१ जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू

अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई अग्निशमन दलातील आतापर्यंत एकूण ४१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे अग्निशमन दलातील जवानांमध्येही चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

अग्निशमन दलातील ४१ जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू
SHARES

गोरेगाव अग्निशमन केंद्रात ड्रायव्हर-ऑपरेटर पदावर कार्यरत असलेले रफिक शहाबुद्दीन शेख (५७) यांचा गुरुवारी कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. आठवड्याभराच्या कालावधीत अग्निशमन दलातील दुसऱ्या जवानाचा कोरोनाने बळी (mumbai fire brigade employee died from covid-19) घेतला आहे. अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई अग्निशमन दलातील आतापर्यंत एकूण ४१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे अग्निशमन दलातील जवानांमध्येही चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

संशयास्पदरित्या मृत्यू

रफिक शेख यांच्यावर विरार येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथं गुरुवारी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर त्याआधी उमेश गोंगा (५८) या अग्निशमन जवानाचा २४ मे रोजी कोरोनाने मृत्यू झाला होता. गोंगा गवालिया टँक अग्निशमन केंद्रात कार्यरत होते. गोंगा यांना ताप आणि डायरियाचा त्रास जाणवू लागल्याने ते जे.जे. रुग्णालयात गेले. परंतु तिथं दाखल करून घेण्यास त्यांना नकार देण्यात आला होता. टायफाईड असल्याचं सांगत डाॅक्टरांनी त्यांना औषधे दिली आणि घरी पाठवलं. परंतु त्यांची परिस्थिती खालावल्याने त्यांना पुन्हा जे.जे. आणण्यात आलं. त्यांना आॅक्सिजन लावावा लागला. परंतु काही तासांत त्यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे एकाच आठवड्यात अग्निशमन दलाने आपल्या दोन सहकाऱ्यांना कोरोनामुळे गमावलं. 

हेही वाचा - मुंबईत सील केलेल्या इमारतींची संख्या १० दिवसांत दुप्पट

४ जण आयसीयूत

मुंबई अग्निशमन दलातील ४१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील २२ जणांवर शहरांतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी ४ जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. ३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १४ जण होम क्वारंटाईनमध्ये राहात आहेत. 

औषधांची फवारणी

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ३५ हजारांच्या पलिकडे जाऊन पोहोचली असताना या विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या हातात हात घालून अग्निशमन दलाचे जवानही रस्त्यावर उतरले आहे. यामाध्यमातून रुग्णालये, महत्त्वाचे रस्ते, बस गाड्या, वर्दळीच्या ठिकाणांवर औषधांची फवारणी केली जात आहे. पाण्यात सोडियम हायड्रोक्लोराईड टाकून त्याची फवारणी केली जात आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व जवानांना पीपीई किट देखील देण्यात आल्याचं जवानांचं म्हणणं आहे.

तर, मुंबई महापालिकेच्या एकूण १ हजार ५२९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं आता समोर आलं आहे. मुंबई महापालिकेने प्रथमच पालिकेतील लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा