Advertisement

लक्षणं नसलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचं आता घरीच विलगीकरण

अतिसौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना जर त्यांच्या घरातच विलगीकरणाची योग्य सुविधा उपलब्ध असेल तर, त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.

लक्षणं नसलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचं आता घरीच विलगीकरण
SHARES

अतिसौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचं घरीच विलगीकरण करता येईल शिवाय विलगीकरणाचा काळ संपल्यावर या रुग्णांची पुन्हा कोरोना चाचणी आवश्यक नसल्याचं आरोग्य विभागाने (coronavirus live updates asymptomatic or mild symptoms Covid 19 patients can home quarantine as per new guidelines of maharashtra health department) म्हटलं आहे. घरी विलगीकरणात राहणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाला केवळ एक प्रतिज्ञापत्र भरून द्यावं लागणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना देखील आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत. 

मार्गदर्शक सूचना

आरोग्य विभागाचे  विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या मार्गर्शक सूचनां संदर्भातील पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. या पत्रानुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केलं जातं. त्यातील अतिसौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना जर त्यांच्या घरातच विलगीकरणाची योग्य सुविधा उपलब्ध असेल तर, त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणं आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला कोरोना चाचणीची आवश्यकता नसेल, असं या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा- घाटकोपर, भांडुपमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर घटला

गृह विलगीकरणासाठी काय आवश्यक?

  • गृह विलगीकरणासाठी अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णाला अतिसौम्य किंवा लक्षणं नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करणं आवश्यक आहे.
  • ज्या रुग्णाला घरी विलगीकरण (आयसोलेशन) करायचं आहे त्याच्यासाठी तसंच त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी गृह अलगीकरणाची (होम क्वारंटाईन) सोय असणं आवश्यक आहे.
  • या रुग्णाची घरी रात्रं-दिवस काळजी घेणारी व्यक्ती असणे आवश्यक आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि उपचार करणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी, मोबाईल) असावी.
  • काळजी घेणारी व्यक्ती आणि त्या कुटुंबातील सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी.
  • मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप कार्यान्वित असणं आवश्यक आहे.
  • सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकास रुग्णाबाबत माहिती देणे अनिवार्य आहे.
  • गृह विलगीकरणाविषयी प्रतिज्ञापत्र भरून दिल्यानंतर त्या व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.

वैद्यकीय मदत कधी?

  • काळजी घेणाऱ्या व्यक्तीने रुग्णाच्या तब्येतीकडे सतत लक्ष द्यावं.
  • रुग्णाला धाप लागली, श्वासोच्छावासास अडथळा निर्माण होत असेल, छातीमध्ये सतत दुखत असेल, शुद्ध हरपत असेल, ओठ, चेहरा निळसर पडला असेल अशी लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

गृह विलगीकरण कधीपर्यंत?

गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १७ दिवसानंतर किंवा रुग्णाला लक्षणं नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तिथून १७ दिवसानंतर. मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर त्या व्यक्तीला गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्याचा हा गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असं या सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा