मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. रुग्णांच्या होणारी वाढ लक्षात घेता महापालिकेनं खाटांच्या संख्येतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असून, अनेक मोठ्या कंपन्यांनी रुग्णालयाची व्यवस्था करून रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, 'एमएमआरडीए' काही दिवसांपूर्वी कोविड दक्षता सुविधा केंद्रांची केली होती. आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (एमएमआरसी) पश्चिम उपनगरातील दहिसर व बोरिवली येथे हे दोन कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, राज्य शासनाकडून शक्य तितकी वैद्यकीय क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकट्या मुंबईत ८५०हून अधिक जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत राज्य सरकारच्या एमएमआरडीए, एमएमआरसी, पोर्ट ट्रस्ट आदी संबंधित संस्थांनी लढाईत उडी घेतली आहे.
एमएमआरसीतर्फे दहिसर चेकनाका परिसरात ८०० खाटांचे अलगीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या केंद्रात २०० ऑक्सिजनीटेड खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या केंद्रांसोबत कांदरपाडा, बोरिवली आरटीओ कार्यालयानजीक २५० खाटांचे कक्ष उभारण्याचे नियोजन सुरू आहे. या ठिकाणी हाय डिपेंडन्सी युनिट्स (एचडीयू) तसेच डायलिसिसची सुविधा असणारा अतिदक्षता विभाग देखील असणार आहे.
हेही वाचा -
अनेक विमानं रद्द, विमानतळावर प्रवाशांची गर्दी
मर्यादित रेल्वे कर्मचाऱ्यांनाच लोकलनं प्रवास करता येणार