सुरक्षा वाढवल्याने रुग्णालयातली गर्दी ओसरली

 Mumbai
सुरक्षा वाढवल्याने रुग्णालयातली गर्दी ओसरली

डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे मुंबईतल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यामुळे सायन, केईम, नायर आणि जे. जे. रुग्णालयात होणाऱ्या गर्दीत तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी घट झाल्याचं पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या सरकारी रुग्णालयात एरवी दिवसाला 10 हजार ते 30 हजार नातेवाईकांची गर्दी असायची. मात्र नवीन नियम लागू झाल्याने या गर्दीत लक्षणीय घट झाली आहे. 

मुंबईतील या सरकारी रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 650 सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून वैध परवाने किंवा पासेस असणाऱ्यांनाच रुग्णालयात सोडण्याची परवानगी आहे. एवढंच नव्हे तर सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमाने देखील रुग्णालयातल्या प्रवेशद्वारावर पहारा ठेवण्यात येत आहे. 

एका रुग्णाबरोबर दोनच नातेवाईक हा नियम लागू झाल्यापासून रुग्णालय परिसरात होणारी गर्दी कमी झाली आहे 

- अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईम रुग्णालय

रुग्णालयात गर्दी कमी झाल्याने डॉक्टरांच्या सुरक्षेसह रुग्णालयामध्ये स्वच्छता राखण्यास देखील मदत होईल, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. दरम्यान, रुग्णालयातील सुरक्षा वाढवण्यात आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या, तसेच स्थानिक नेत्यांच्या तक्रारी आल्या असल्याचं देखील सांगितलं जातंय.

Loading Comments