Advertisement

108 रुग्णवाहिकेच्या सेवेत कट प्रॅक्टिसचा गोरखधंदा


108 रुग्णवाहिकेच्या सेवेत कट प्रॅक्टिसचा गोरखधंदा
SHARES

कट प्रॅक्टिसविरोधातला कायद्याचा मसुदा तयार झाला असून त्यासाठी सुचवण्यात आलेल्या सूचना, हरकतींचा सध्या विचार केला जात आहे. यासंदर्भात विविध विभागातील प्रतिनिधींनी बैठक घेतली. त्यानंतर राज्य शासनाने सुरू केलेल्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेतही कट प्रॅक्टिस केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२३ तारखेला आरोग्य भवनात सर्व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर किंवा वेगवेगळ्या संघटनांची कट प्रॅक्टिसवर बैठक झाली. त्या बैठकीत पॅथोलॉजी संघटना आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी हा मुद्दा नजरेस आणून दिला.

सर्व कमवताहेत नफा

रुग्णवाहिकेच्या चालकांपासून कर्मचाऱ्यांमार्फत सर्वच जण नफा कमवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही काही डॉक्टरांनी उघड केले. त्यामुळे रुग्णवाहिकेसाठी जे कर्मचारी काम करतात त्या सर्वांनाही कट प्रॅक्टिस कायद्यांतर्गत समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

कट प्रॅक्टिसविरोधी कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात आहे. पण, अजूनही या कायद्यात कोणकोणत्या सूचना, हरकतींचा समावेश करून घेता येऊ शकतो याचा विचार केला जात आहे. त्यातच 108 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेत मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टिस केली जाते, असा गौप्यस्फोट सदर बैठकीत काही डॉक्टरांनी केला.


महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा १९६२ आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कायदा १९६५, या दोन्ही कायद्यांची प्रभावशाली अंमलबजावणी झालीच पाहिजे. तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील इतर कायद्यांचीही अंमलबजावणी झाली तरच कट प्रॅक्टिस थांबू शकेल.

- डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथालाॅजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलाॅजिस्ट संघटना


कमिशनची देवाण-घेवाण

रुग्णवाहिकेचे कर्मचारी आणि चालक अापत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मदत करतात. परंतु, रुग्णालयात रुग्णांना सोडल्यानंतर त्या रुग्णालयाकडून किंवा तेथील डॉक्टरांकडून ते कमिशनही घेतात, असे या डॉक्टरांनी सांगितले. बऱ्याचदा रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक तणावाच्या वातावरणाखाली असल्याने हा कमिशनचा घोळ कोणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे, रुग्णवाहिकेच्या सेवेतील कमिशनच्या देवाण-घेवाणीमध्ये वाढ झाल्याचेही यावेळी स्पष्टपणे सांगितले गेले.


आरोग्यसेवा क्षेत्रातील पुरवठादारांना कट प्रॅक्टिसविरोधातील कायद्यातील सर्व तरुतूदी लागू करण्यात याव्यात. त्यामुळे भविष्यात कारभारात आणि कामात पारदर्शीपणा येईल. शिवाय, लोकांचा विश्वास कायम टिकून राहील. म्हणूनच हे सर्व नियम सर्वांना लागू केले तर कदाचित फरक पडेल.

- डॉ. रवी वानखेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन


दरम्यान, एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी काही महिन्यांपूर्वीच कट प्रॅक्टिसविरोधात एक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आता सर्वांनीच पुढाकार घेऊन कट प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली गेली.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा