Advertisement

कोरोना नसल्यास H1N1 ची चाचणी करा, तज्ञांचा सल्ला

मुंबईत स्वाइन फ्लू (Swine Flu) अर्थात एन्फ्लुएंझा H1N1 हा विषाणूही डोकं वर काढलं आहे. स्वाइन फ्लू आणि कोविड १९ (Covid19) या दोन्ही आजारांची लक्षणं बऱ्यापैकी सारखीच आहेत.

कोरोना नसल्यास  H1N1 ची चाचणी करा, तज्ञांचा सल्ला
SHARES

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेपाठोपाठ आता मुंबईत स्वाइन फ्लू (Swine Flu) अर्थात एन्फ्लुएंझा H1N1 हा विषाणूही डोकं वर काढलं आहे. स्वाइन फ्लू आणि कोविड १९ (Covid19) या दोन्ही आजारांची लक्षणं बऱ्यापैकी सारखीच आहेत. त्यामुळे रुग्ण कोविडच्या उपचारांना प्रतिसाद देत नसल्यास स्वाइन फ्लूची तपासणी करावी, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

सर्दी, ताप आणि डोकेदुखीच्या दोन रुग्णांवर मुंबईतले संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी नुकतेच उपचार केले. त्यापैकी तिशीतला एक रुग्ण नुकताच कोरोनामधून बरा झाला होता. त्याला ९० दिवसांत पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता फारच दुर्मिळ असल्याने डॉक्टरांनी त्याला स्वाइन फ्लूची चाचणी करायला सांगितलं.  डॉक्टरांचा अंदाज बरोबर आला. रुग्णाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर डॉ. नागवेकर यांनी आणखी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. यामध्ये आणखी एक रुग्ण एच१एन१ संक्रमित तर तिसरा रुग्ण H3N2 या एन्फ्लुएंझा ए प्रकारच्या उपप्रकाराची लागण झालेला एक रुग्ण आढळला. 

स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने कोरोनाव्यतिरिक्त अन्य विषाणूंचा फैलावही होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पेशंट कोविडच्या उपचारांना दाद देत नसेल, तर बाकीच्या विषाणूंच्या संसर्गाची शक्यता गृहीत धरायला हवी, असं मत डॉ. नागवेकर यांनी व्यक्त केलं.

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानेही H1N1 च्या दोन रुग्णांची महापालिकेकडे नोंद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यावर्षात पालिकेच्या आकडेवारीनुसार  H1N1 ची दोन प्रकरणे समोर आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली होती त्यावेळी ४४ रुग्णांची नोंद झाली होती. तर २०१९ मध्ये ४५१ रुग्णांची नोंद झाली होती आणि ५ जणांचा मृत्यू झाला होता.

संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितलं, कोविड आणि स्वाइन फ्लू हे दोन्ही श्वसनसंस्थेशी निगडित आजार आहेत. त्यामुळे निदान योग्य होणं गरजेचं आहे. लक्षणांमध्ये साधर्म्य असलं तरी हे विषाणू किती दिवस सुप्तावस्थेत राहतात आणि त्यांचा संसर्ग कसा पसरतो, यात फरक आहे. H1N1चा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण त्यामुळेही गंभीर आजार होऊन मृत्यू होऊ शकतो, असंही डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितलं.



हेही वाचा -

३० ते ४४ वयोगटाचं मोफत लसीकरण

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करत असाल तर सावधान!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा