Advertisement

मुंबईकरांनो, बिनधास्त खा अंडी


मुंबईकरांनो, बिनधास्त खा अंडी
SHARES

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, असे म्हणत अनेकजण अंडी फस्त करत असतील. पण गेल्या काही दिवसांपासून अंडी खावीत की नाही, असा प्रश्न अनेकांना सतावू लागला आहे. याच कारण आहे प्लॅस्टिक-चिनी बनावटीच्या अंडी बाजारात विक्रीस आल्याच्या चर्चा. हो, ही केवळ चर्चाच असून, प्लॅस्टिक अंडी असा प्रकारच मुंबईसह राज्यात अस्तित्वात नसल्याचा दावा पशुवैद्यक आणि विषविज्ञान तज्ज्ञ डॉ. संजय बोकन यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे. 

प्लॅस्टिक अंडी नव्हे तर राज्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे अंडी खराब होत असून, त्यामुळे अंड्याचे आवरण आणि अंड्यातील बलक एकमेकांंना चिकटत असून, हा बलक दिसताना प्लॅस्टिकसारखा दिसत असल्याची माहितीही डॉ. बोकन यांनी दिली आहे. त्यामुळेच संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, असा सल्लाही डॉ. बोकन यांनी दिला आहे. पण उन्हाळ्यात अंडी खराब होत असल्याने उन्हाळ्यात अंडी खाण्याचे प्रमाण कमी करत एरवी अंड्यावर ताव मारावा असेही म्हटले आहे.

प्लॅस्टिकची अंडी तयार करणे एवढे सोपे नाही. प्लॅस्टिकच्या अंड्यांच्या निर्मितीसाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आणि त्यातून जे अंडे तयार होईल, त्याची किंमती ही खूपच न परवडणारी असेल. त्यामुळे राज्यात तरी प्लॅस्टिकची अंडी नाहीत हे निश्चित असे म्हणत डॉ. बोकन यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्लॅस्टिक अंडी नसल्याच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. अंड्यामध्ये एक पोकळी असते आणि त्यावरील पांढरे आवरण हे सच्छिद्र असते. या सच्छिद्रांमधून बाहेरची हवा पोकळीत जाते आणि अंड्यातील पोकळी वाढून पांढरा बल्क आणि पिवळा बल्क यांच्यासह अंड्याच्या आवरणामधील पातळ आवरण चिकटते. उन्हाळ्यात ही प्रक्रिया आणखी तीव्र होते. दरम्यान गेल्या पंधरा दिवसात मुंबईसह राज्यात पारा चढलेला आहे आणि त्यामुळेच अंडी खराब होत आहेत. अंडीचा आतील भाग एकमेकांना चिकटून बसतात आणि त्याला घाण वास येतो, असे सांगत डॉ. बोकन यांनी प्लॅस्टिक नव्हे तर खराब अंडी ग्राहकांच्या हाती पडत असल्याचे स्पष्ट केले आहे.

अंड्यात प्रोटीन असते आणि 50 ते 55 डिग्री सेल्सिअसमध्ये प्रोटीन खराब होतात. त्यानुसार मुंबईतील तापमान सध्या 35 ते 38 च्या डिग्री सेल्सिअस असून, ही अंडी रॅकमध्ये एकावर एक ठेवून आणली जातात. त्यामुळे आधीच असलेल्या उष्णतेत वाढ होऊन अंडी खराब होत असल्याचेही डॉ. बोकन यांनी स्पष्ट केले आहे. एफडीएचे सहआयुक्त (अन्न) बृहन्मुंबई, सुरेश अन्नपुरे यांनीही उष्णतेमुळेच अंडी खराब होत असून, ती प्लॅस्टिकसारखी भासत असल्याचे स्पष्ट केले आहे.


हा तर सोशल मीडियावरचा खेळ
प्लॅस्टिक अंडी सापडल्याच्या चर्चा रोजच्या रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून कानावर येताहेत पण प्रत्यक्षात एकही व्यक्ती यासंबंधीची तक्रार घेऊन एफडीएकडे आलेली नाही अथवा कोणी अंडी तपासण्यासाठीही दिलेली नाहीत. अंडी तपासून मग प्लॅस्टिक अंडी असल्याचा दावा करणे तर दुरच असे म्हणत अन्नपुरे यांनी ही केवळ सोशल मीडियावरचीच चर्चा असल्याचे सांगितले आहे. जनतेने अशा अफवांना बळी पडू नये. अंडी खराब असतील तर निश्चित एफडीएकडे संपर्क करावा, असे आवाहनही केले आहे. प्लॅस्टिक अंड्याच्या चर्चेनंतर काळजी म्हणून अंधेरीसह अन्य एका ठिकाणाहून अंड्याचे दोन नमुने घेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असेही अन्नपुरे यांनी सांगितले.



आम्ही दररोज शेकडो अंड्यांची विक्री करतोय. पण अजून तरी मला प्लॅस्टिकचे एकही अंडे आढळलेले नाही. इतकेच नव्हे तर एकाही ग्राहकाने प्लॅस्टिकचे अंडे दिल्याची तक्रारही आमच्याकडे केलेली नाही. त्यामुळे प्लॅस्टिकची अंडी असतील यावर माझा मुळीच विश्वास नाही.
स्टॅनी देविदास, मालक, ईडन एग्ज


डोंबिवलीतील तक्रारीत तथ्य नाही
पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवलीत एका व्यक्तीने प्लॅस्टिकचे अंडे आढळल्याचा दावा केला आणि त्यानंतरच मुंबईत प्लॅस्टिक अंड्याच्या चर्चेने वेग धरला. यासंबंधी संबंधित व्यक्तीने तक्रार केली नाही, पण एफडीएनेच या व्यक्तिकडे धाव घेत तपासणी केली असता याप्रकरणी काहीही तथ्य नसल्याचे समोर आल्याची माहिती सहआयुक्त सुरेश देशमुख (अन्न) ठाणे यांनी दिली आहे.

अशी ओळखा शिळी अंडी
अंडी उकडल्यानंतर पांढरा भागाला खड्डा पडतो
अंडी उकडल्यानंतर पिवळा आणि पांढऱ्या बल्कमध्ये काळी लाईन येते
उकडलेल्या अंड्याला आवरण चिकटून रहाते
घाणेरडा वास येतो

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा