Advertisement

पित्याने ‘सीपीआर’ देऊन वाचवले बाळाचे प्राण


पित्याने ‘सीपीआर’ देऊन वाचवले बाळाचे प्राण
SHARES

आता अडीच महिन्यांचा असलेला चिमुरडा प्रियम चौधरीने मृत्यूशी लढाई जिंकली आहे. प्रियम आता पूर्ण बरा झाला असल्याचा निर्वाळा त्याच्यावर उपचार करणाऱ्या वाडिया रुग्णालयातील डॉक्टर बिस्वा पांडा यांनी दिला आणि प्रियमच्या आई-वडीलांचा जीव सर्वार्थाने भांड्यात पडला. कोण प्रियम चौधरी? त्याला रुग्णालयात कशासाठी दाखल करण्यात आलं होतं? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी  एक महिना मागे जावं लागेल. 


एक महिन्यापूर्वी...


भाईंदरहून एका चारचाकीतून उपचारांसाठी निघालेल्या प्रियमला अचानक श्वासोच्छवास घ्यायला त्रास होऊ लागला आणि आपल्या 45 दिवसांच्या बाळाला होणारा त्रास त्याच्या वडिलांना कळला. आई-वडिलांचे हात-पाय थंड पडले. अशा परिस्थितीत काय करावं हे सुचत नसताना वडिलांनी मात्र हिंमत सोडली नाही. वडिलांनी लगेचच सीपीआर या प्रथमोचाराची मदत घेत मुलाला कसंबसं वाडिया रुग्णालयामध्ये दाखल केलं.

भाईंदरमध्ये राहणारे गुड्डू चौधरी... यांनीच आपल्या 45 दिवसांच्या बाळाचा सीपीआर देऊन प्राण वाचवला. वाडिया रुग्णालयात उपचारांसाठीच प्रियमला भाईंदरहून परळ येथे नेण्यात येत होते. पण, अचानक प्रवासात प्रियमला श्वासोच्छवास घेता येत नव्हता. पण, गुड्डू चौधरी यांनी हार न मानता आपल्या मुलावर सीपीआर प्रथमोचार पद्धती वापरली आणि त्याला सुखरुप वाडिया रुग्णालयात दाखल केले.

गुड्डू चौधरी यांना त्यांच्या ‘कुणाल किचन वेअर  ’ या कंपनीतून सीपीआरचं प्रशिक्षण दिलं गेलंय. ज्याचा वापर त्यांनी आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी केला.



मृत्यूशी यशस्वी झुंज


3 जूनला प्रियमला वाडिया रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर त्याच्या ह्रद्यात ट्युमर असल्याचं डॉक्टरांच्या तपासणीत उघड झालं. 45 दिवसांचा प्रियम आपल्या इवल्याशा जीवाने ह्रद्याच्या ट्युमर सारख्या भयानक आजाराचा सामना करत होता. पण, म्हणतात ज्याची जगण्याची इच्छाशक्ति प्रबळ असते, तो संकटांवर मात करतोच.

8 जूनला प्रियमवर अत्यंत गुंतागुंतीची ह्रद्यरोग शस्त्रक्रिया करण्यात आली. बालह्र्दयरोग शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. बिस्वा पांडा यांच्या टीमने अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. प्रियमच्या ह्रद्यातून जवळपास 2 सेमीचा ट्युमर काढण्यात आला आहे.



गुड्डू चौधरी आणि राखी चौधरी असं प्रियमच्या आई-वडिलांचं नाव असून त्यांना 10 वर्षांचा मुलगा देखील आहे. हे दोघेही मुळचे बिहारचे असून मासिक उत्पन्न फक्त 5 ते 6 हजार असेल. तरी, प्रियमच्या आई-वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.


वाडिया रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी प्रियमला भाईंदरच्या सक्सेना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांचा जवळपास 80 ते 90 हजार रुपये खर्च झाला आहे. आणि वाडिया रुग्णालयात जवळपास 55 हजार रुपये एवढा खर्च झाला आहे.    

''प्रियमला सतत 15 दिवस ताप येत होता. उपचार करुनही त्याची प्रकृती आणखीनच खालावली. घरातून आम्ही त्याला वाडियां रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन येत होतो तेव्हा त्याला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. म्हणून मी त्याला सीपीआर दिला. त्याचे हात-पाय चोळले. त्याला तोंडाद्वारे श्वास दिला. त्याच्या ह्रद्यावर दाब दिला. त्यानंतर त्याची पुन्हा प्रकृती स्थिर झाली. आणि मग वाडिया रुग्णालयात आम्ही प्रियमला दाखल केलं. त्यानंतर त्याला ह्रद्याचा ट्यूमर आहे असं इथल्या डॉक्टरांनी सांगितलं. इथल्या डॉक्टरांनी आम्हाला खूप मदत केली. मी समाधानी आणि आनंदी आहे. '’

गुड्डू चौधरी, प्रियमचे वडील


सीपीआर म्हणजे काय –

सीपीआर हे जीव वाचवणारे तंत्र आहे. या तंत्राचा वापर केल्यामुळे हृदय आणि मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत रुग्णाला वेळ मिळतो. म्हणजेच तुम्ही तुमचा श्वास त्या रुग्णाला तोंडाद्वारे देऊ शकता. त्या रुग्णाच्या ह्रद्यावर दाब दिल्याने रक्तप्रवाह व्हायला मदत होते. ही एक प्राथमिक उपचार पद्धती आहे.


“प्रियमला श्वासोच्छवास करायला त्रास होत होता. वाडिया रुग्णालयात आणल्यावर त्याला ताबडतोब बालअतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला व्हेंटिलेटर लावून त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली आणि त्याचं परीक्षण करण्यात आलं. सुरुवातीला आम्हाला वाटलं की, छातीमध्ये संसर्ग झाला असेल आणि उपचारांसह प्रतिजैविकं ताबडतोब देण्यात आली. इकोकार्डिओग्राफीमध्ये त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूला मोठा गोळा असल्याचे निदान झालं. ट्युमर काढण्यासाठी बाळावर ओपन हार्ट सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.”

डॉ. बिस्वा पांडा, बाल हृदयरोग शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख


ही शस्त्रक्रिया तब्बल 6 तास चालली. त्यानंतर बाळाची प्रकृती दोन आठवड्यानंतर सुधारली. आणि आता प्रियम अडीच महिन्यांचा झाला असून त्याची प्रकृती अगदी चांगली आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा