Advertisement

कुपोषणात मुंबई आफ्रिकेच्याही पुढं..!


कुपोषणात मुंबई आफ्रिकेच्याही पुढं..!
SHARES

देशाची आर्थिक राजधानी ते 'मेट्रो सिटी' अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईचं सर्वांनाच आकर्षण वाटतं. मुंबईतल्या काॅर्पोरेट्स उलाढाली सर्वपरिचित आहेतच. पण त्याच जोडीला शहरात अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थाही उदयाला येऊ लागलीय. टोलेजंग इमारती, नवी लाइफस्टाइल यामुळं मुंबईचा चेहरा बदलू लागलाय. पण याच मुंबईच्या गर्भातलं भयानक वास्तव एका सामाजिक संस्थेनं पुढं आणलंय. मुंबई भलेही टप्प्या टप्प्यानं विकसीत होत असली, तर अजूनही शहरातील बहुसंख्य रहिवासी झोपडपट्टीत  राहतात. निकृष्ट पायाभूत सुविधा अन् आरोग्य व्यवस्थेशी झुंज देणाऱ्या गोवंडी परिसरातील ५० टक्के मुलं कुपोषित असल्याचं समोर आलं आहे.

कुपोषण म्हटलं, की डोळ्यासमोर पालघर, नाशिक किंवा मेळघाटातील दुर्गम आदिवासी भाग समोर येतो. पण, मुंबईतील एम वॉर्ड म्हणजेच गोवंडी परिसरात तब्बल ५० टक्के कुपोषित बालकांचं प्रमाण असल्याचं सत्य गोवंडीतील ‘अपनालय’ या संस्थेनं उघड केलंय.

‘अपनालय’ या आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार या भागातील ४ पैकी २ बालकं कुपोषित आहेत. ३५ % बालकं कमी वजनाची आहेत. या परिसरात राहणाऱ्या ३५ टक्के कुटुंबांची कमाई महिन्याला अवघी ४ ते ६ हजार रुपये आहे. त्यामुळं या पालकांना आपल्या मुलांना पोषक आहारही देता येत नाही किंवा गरोदरपणात मातांना पोषक आहार मिळत नाही. त्यामुळं या परिसरात कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे. गोवंडी डम्पिंग ग्राऊंड जवळ राहणाऱ्या साडे तीन हजार लहान मुलांच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.



गोवंडीतील ७ झोपडपट्टीमध्ये ‘अपनालय’ या संस्थेने गेल्या महिन्यात एक सर्वेक्षण केलं.  रफीनगर, साईनगर, निरंकारी नगर, बुद्धनगर, शांतीनगर, इंदिरानगर आणि आदर्शनगर या झोपडपट्टीच्या आणि डम्पिंग ग्राऊंडच्या शेजारी राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं.

‘अपनालय’ च्या २०१७ च्या अहवालानुसार इथल्या महापालिकेच्या शाळेत शिकणारी ५०% मुलं कुपोषित आहेत. शहरातील सर्वात कमी म्हणजे ०.५ पेक्षाही कमी मानव विकास निर्देशांक या विभागात नोंदवला गेला आहे. अनेक आफ्रिकन देशांपेक्षा ही परिस्थिती वाईट आहे.


कुपोषणाचे तीन प्रकार

वेस्टिंग – यात उंचीच्या तुलनेत बालकाचं वजन कमी असतं. (१८ टक्के)

स्टन्टिंग – यात वयाच्या तुलनेत बालकाची उंची कमी असते. (५३ टक्के)

अंडरवेट– यात वयाच्या तुलनेत बालकाचं वजन कमी असतं. (४४ टक्के)

५ वर्षांखालील ४५ टक्के मुलांचे मृत्यू हे अपुऱ्या पोषणामुळे होतात. कुपोषित बालकांना किमान दोन वर्ष योग्य आहार दिल्यास त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होऊ शकते.


दर महिन्याला आरोग्यसेवक एम-वॉर्ड भागात जाऊन तिथल्या मुलांच्या प्रकृतीची तपासणी करतात. गेल्या महिन्यात कुपोषणासंदर्भात हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात ० ते ६ वयोगटातील साडेतीन हजार मुलांचा समावेश करण्यात आला. या आरोग्य तपासणीत ५० टक्के मुलं कुपोषित असल्याचं आढळून आलं. कुपोषित बालकांबाबत मुंबई महापालिकेलाही माहिती देण्यात आली आहे.

 - निनाद साळुंखे, संचालक (प्रकल्प), ‘अपनालय’   


शिवाय, कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं,  याकरता संस्थेच्या माध्यमातून या परिसरात दरवर्षी विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं जातं. आता ही न्यूट्रिशियन आठवडा सुरू असल्याचं साळुंखे यांनी सांगितलं.

मुंबई म्हणजे एक वेळचं अन्न कसंही कमवून खाता येणारं शहर... पण, देशाच्या आर्थिक राजधानीत कुपोषणाची समस्या भेडसावणं याचा आपण सर्वांनीच विचार करायला पाहिजे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा