'ऑटीझम'विषयी हे तुम्हाला माहीत आहे का?

  Mumbai
  'ऑटीझम'विषयी हे तुम्हाला माहीत आहे का?
  मुंबई  -  

  'बर्फी' या सिनेमातील प्रियांका चोप्राने साकारलेली झिलमिल आणि 'माय नेम इज खान' सिनेमात वारंवार 'आय अॅम नॉट अ टेररिस्ट' म्हणणारा शाहरुख खान आपल्या सर्वांनाच आठवत असेल. आत्ममग्नता अर्थात ऑटिझम हा आजार झालेली ही दोन्ही पात्र आपल्या लक्षात राहिली. किंबहुना या पात्रांविषयी सिनेमा बघताना आपल्याला वाईटही वाटते. मात्र खऱ्या आयुष्यात जेव्हा अशा रुग्णांशी लोकांचा सामना होतो, तेव्हा त्यांच्याकडे बघण्याची नजर अनेकदा बदललेली असते. 

  लहान मुलांमध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत या आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजारात लहान मुलांमध्ये भावना व्यक्त करण्याच्या आणि संवाद साधण्याच्या क्षमतेचा विकास होत नाही.


  या आजाराची लक्षणे?

  • नजरानजर न करणे
  • दुसऱ्याचा स्पर्श सहन न होणे
  • पालकांच्या स्पर्शाने देखील बाळाला आनंद न वाटणे
  • इतर मुलांमध्ये न मिसळणे
  • स्मितहास्य न करणे
  • सारखे आवाज देऊनही प्रतिसाद न देणे
  • संवादकौशल्यात पारंगत नसणे
  • एकलकोंडा स्वभाव होणे
  • भावनाविरहित चेहरा
  • शून्यात एकटक पहात बसणे
  • न कंटाळता एकाच कृतीत रममाण होणे
  • निर्जीव वस्तूंच्या किंवा प्राण्यांच्या सहवासातच सतत राहणे
  • आजूबाजूला काय घडत आहे याचा सुतराम संबंध नसल्यासारखे वागणे
  • एखाद्या शब्दाचा सतत पुनरुच्चार करणे
  • डोळ्यांची आणि हातांची विचित्र हालचाल करणे
  • समोरच्याने बोललेलेच परत बोलणे.
  • कधीकधी हिंसक होणे
  • 'भाषा' न येणे किंवा उशिरा येणे
  • भान नसणे (बधिरता)

  ऑटीझम हा आजार झालेल्या मुलांकडे बघण्याचा आई-वडील आणि समाज या दोघांचा दृष्टीकोन कसा असावा, यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आई-वडील आणि मुलं उपस्थित होते. या कार्यक्रमात ऑटिझम झालेल्या मुलांसोबत कसे वागावे? त्यांना कशा पद्धतीची वागणूक द्यावी? याबाबत काही शिक्षकांनी पालकांना शिकवले आणि आपले काही अनुभव ही शेअर केले.


  पालकांनी काय करायला हवं?

  • पालकांनी मुलांशी संवाद करायला हवा
  • ऑटिझमचे तातडीने निदान होणे गरजेचे
  • आईवडिलांनी मुलाकडे दुर्लक्ष करू नये
  • ऑटिझम किती तीव्र आणि किती सौम्य स्वरुपाचा आहे हे पाहणे
  • हा रोग नाकारू नये, खूप अपेक्षा ठेवू नये
  • अशा मुलांना शिवणकला, चित्रकला किंवा भाज्या कापणे या गोष्टी शिकवाव्यात
  • यासाठी मनोविकारतज्ज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा


  आई-वडिलांवर अशा मुलांना सांभाळताना खूप ताण येतो. पण, त्यांनी नेहमी हसत राहिले पाहिजे. जर, सौम्य प्रकारचा ऑटिझम असेल तर, ते मूल लवकर बरं होतं. ऑटिझम या आजारावर गोळ्यांनी परिणाम होत नाही.


  उपचार

  • चित्रांच्या साहाय्याने शब्द उच्चारायला शिकवावे
  • मुलांना इतरत्र मिसळू द्यावे
  • पालकांनी स्वत: आनंदी रहावे
  • अशा मुलांशी खूप चांगले वागणे
  • अशा मुलांचं सशक्तीकरण करणे 
  • त्यांना प्रेरणा देणे
  • मुलांना प्रत्येक गोष्टीत सक्रिय करणे
  • मुलांना स्वत:बद्दलची माहिती द्यायला शिकवणे
  • मानसिक उपचार देणे
  • वारंवार डॉक्टरांचा सल्ला घेणे


  ऑटिझमसाठी काही संस्था काम करतात. ज्या अशा मुलांना कसं वागावं? कसं बोलावं हे शिकवतात. त्यांचे काही ग्रुप्स असतात. जी गेली अनेक वर्ष अशा मुलांसाठी काम करत आहेत.


  - पी. एस. बुर्डे, जनरल सेक्रेटरी, परिवार-पालक संस्था, राष्ट्रीय महासंघ


  आई-वडिलांना ऑटिझम झालेल्या मुलांना हाताळणं खूप कठीण होतं. मुळात आधी आपल्याला असं बाळ झालं आहे हे स्वीकारणंच आई-वडिलांना कठीण जातं. त्यामुळे अशा आई-वडिलांनी आपल्या मुलाला आधी स्वीकारण्याची गरज असते. आणि आपल्या बाळावर विश्वास ठेवत त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायला पाहिजेत.

  - पारुल कुमठा, अध्यक्ष, फोरम फॉर ऑटिझम

  ऑटिझम झालेली मुलं वेडी नसतात. त्यांच्यात काही अशी लक्षणे असतात, जी लहानपणापासून त्यांच्या आई-वडिलांना कळतात. पण, अशा मुलांना आई-वडील स्वीकारायला खूप उशीर लावतात. परिणामी, अशा मुलांचा विकास व्हायला फार काळ जातो. त्यामुळे अशा मुलांच्या आई-वडिलांनी आधी त्यांचा मनापासून स्वीकार केला पाहिजे आणि नंतर समाजाने. पण खरंच आपल्या समाजाचा अशा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाय का हाच खरा प्रश्न आहे.  हे देखील वाचा - 

  टेंशन नॉट, लेट्स प्ले द साँग

  यापुढे खा प्युअर व्हेज औषधं!


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.