यापुढे खा प्युअर व्हेज औषधं!

  Mumbai
  यापुढे खा प्युअर व्हेज औषधं!
  मुंबई  -  

  व्हेज-नॉन आणि व्हेज हा प्रकार केवळ जेवणात असतो, हे सर्वज्ञात आहे. पण औषधांमध्येही व्हेज-नॉन व्हेज असा प्रकार असतो आणि आपण ज्या कॅप्सुल घेतो त्या नॉन व्हेजिटेरियन असतात हे सांगितले तर, अनेकांना धक्काच बसेल, तर काहींना हे खरेही वाटणार नाही. पण हो, आपण विविध आजारांवर ज्या कॅप्सुल घेतो त्या नॉन-व्हेजिटेरियन असतात.

  हे देखील वाचा 

  - महागड्या औषधापासून सुटका

  जनावरांच्या चरबीपासून तयार केलेल्या जिलेटिनचा वापर कॅप्सुलचे आवरण अर्थात कवच बनवण्यासाठी केला जातो. मागील 185 वर्षांपासून कॅप्सुल बनवण्यासाठी हीच प्रक्रिया वापरली जाते. महत्त्वाचे म्हणजे याला दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या आणि येत असलेल्या कॅप्सुल या नॉन-व्हेजिटेरियन आहेत हे नक्की. पण यापुढे मात्र रुग्णांना प्युअर व्हेज अर्थात जिलेटिन बेस्ड कॅप्सुलएवजी सेल्यूलोजपासून बनवण्यात आलेल्या वनस्पती बेस्ड कॅप्सुल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण आता केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला असून वनस्पती बेस्ड कॅप्सुल उपलब्ध करून देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार लवकरच व्हेज कॅप्सुल बाजारात उपलब्ध होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती जनआरोग्य चळवळीतील तज्ज्ञ उमेश खके यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

  हे देखील वाचा 

  - जेनेरिक औषधांसाठी सरकार प्रयत्नशील

  जनावरांच्या चरबीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या जिलेटिनपासून कॅप्सुलचे आवारण तयार केले जाते. कॅप्सुलचे आवरण तयार करण्यासाठी आतापर्यंत अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध झालेला नाही. तर जिलेटिनशिवाय कॅप्सुलचे आवरण तयार होऊच शकत नाही, असे औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे देशभरात तयार होणाऱ्या 95 टक्के कॅप्सुल या नॉन व्हेजिटेरियन अर्थात जिलेटिनपासून तयार केलेल्याच असतात असेही तज्ज्ञांनी सांगितले. असे असले तरी, आता लवकरच भारतात प्युअर व्हेज सेल्युलोजपासून तयार करण्यात आलेल्या कॅप्सुल उपलब्ध होण्याची शक्यता दाट झाल्याची माहिती इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या उपाध्यक्ष डॉ. मंजिरी घरत यांनी दिली आहे. मागील दीड वर्षांपासून यावर केंद्राकडून अभ्यास सुरू असून यासंबंधी सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. गेल्या आठवड्यातच यासंबंधी केंद्रात एक महत्त्वपूर्ण बैठकही झाली असून सरकार यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे सेल्यूलोजपासून बनवण्यात आलेल्या कॅप्सुल रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले आहे.

  हे देखील वाचा 

  औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर आता ई-अंकुश

  सेल्यूलोजपासून बनवलेल्या कॅप्सुल महाग असणार असल्याची शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. सेल्युलोजपासून बनवण्यात आलेल्या कॅप्सुलसह जिलेटिनपासून बनवण्यात आलेल्या कॅप्सुलही बाजारात उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे यापुढे फूड प्रोडक्टप्रमाणे औषधांच्या पाकिटावर लाल आणि हिरवे चिन्ह अर्थात नॉन व्हेज-व्हेजचे चिन्ह दिसले तर, दचकून जाऊ नका.


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
  मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.