Advertisement

चीनवरून अवैधरित्या मुंबईत औषधांची आयात?


चीनवरून अवैधरित्या मुंबईत औषधांची आयात?
SHARES

औषध कंपन्या विना परवाना, विना परवानगी औषधांची निर्मिती आणि विक्री करत असल्याचे नुकतेच नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग अथॉरीटीच्या कारवाईतून समोर आले होते. त्यातच आता थेट परदेशातून, चीनमधून अवैधरित्या, विना नोंदणी, विना परवाना औषधांची आयात केली जात असल्याची धक्कादायक माहिती नुकत्याच अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईतून समोर आली आहे. मुंबईतील मेसर्स पीओमा केमिकल्स या कंपनीकडून अवैधरित्या औषधांची आयात केली जात होती. या कंपनीच्या भिवंडीच्या गोदामावर एफडीएने छापा टाकत लॅक्टिटोल मोनोहायर्डेट या औषधांचा 12,730 किलोचा साठा जप्त केला असून, याची किंमत 40 लाख आहे. हा साठा प्रतिबंधित करण्यात आला असून, आता या प्रकरणाची तक्रार थेट केंद्रीय औषध नियंत्रकाकडे करण्यात आली असल्याची माहिती एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे. त्यानुसार आता पुढील कारवाई केंद्रीय औषध नियंत्रकांकडून करण्यात येणार आहे.


हेही वाचा

धक्कादायक... बड्या औषध कंपन्यांकडून विनापरवानगी औषधांची निर्मिती?


पीओमा केमिकल्स कंपनीकडून अवैधरित्या औषधांची आयात केली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार एफडीएने भिवंडीतील गोदामावर छापा टाकला असता 40 लाखाचा लॅक्टिटोल मोनोहायर्डेटचा साठा जप्त केला आहे. कंपनीने हे उत्पादन औषधांसाठी वापरण्यात येत नसल्याची हमी केंद्र सरकारला दिली असताना हे औषध वापरले जात असून, हे उत्पादन (औषध) अवैधरित्या आयात केल्याचे या छाप्यात उघड झाले आहे. Shandong Lujian Biological Technical Co. Ltd या चीनमधील कंपनीकडून हे औषध आयात करण्यात आले होते. तर सन फार्मा, मेडली फार्मा, तिरूपती मेडिकेअर अशा कंपन्यांना हे औषध उत्पादनासाठी विकले जात असल्याचेही तपासणीत समोर आल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले आहे. लॅक्टिटोल मोनोहायर्डेट हे औषध कच्चा माल म्हणून लो कॅलरी अन्न उत्पादना(फुड सप्लीमेन्टरी)साठी वापरले जाते. तर मलावरोधसारख्या आजारावरही हे औषध वापरले जात असून, अऩेक औषधांमध्येही मुख्य घटक म्हणून या औषधाचा वापर केला जातो. असे असताना अवैधरित्या या औषधाची आयात केली जात असल्याचे उघड झाल्याने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे एफडीएकडून सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या कंपनीकडून याआधीही 3 लाख किलोचा आणि 10 कोटी रुपये किंमतीचा औषधांसाठीचा कच्चा माल जप्त केला होता आणि हा साठाही अवैधरित्याच आयात करण्यात आला होता, असेही एफडीएने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा

डॉक्टरांनी जेनेरिक औषधंच लिहून देणं होणार बंधनकारक

डॉक्टरांनो सावधान... औषध कंपन्यांकडून महागडी गिफ्ट घ्याल तर फसाल


परदेशातून औषध आयात करण्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांकडून परवानगी घ्यावी लागते. तर औषध आयात करणाऱ्या कंपनीलाही औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार नोंदणी करावी लागते. त्यानुसार मुंबईतील कंपनीने अशी परवानगी घेतली नसून, चीनमधील कंपनीनेही नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ज्या कंपन्यांना हे औषध विकले आहे, त्या कंपन्यांनाही एफडीएने दणका देत नोटिसा बजावल्या आहेत. तर औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर ज्या ज्या राज्यात औषध विकले गेले आहे, त्या त्या राज्याच्या औषध नियंत्रकांनाही याबाबतची चौकशी करण्याच्या सूचना महाराष्ट्र एफडीएकडून देण्यात आल्या आहेत. तर हे प्रकरण केंद्रीय औषध नियंत्रकांकडेही पाठवण्यात आले आहे. यावरून या प्रकरणाची गंभीरता लक्षात येत असून, अवैधरित्या औषध आयात करण्यात आल्याने औषधाच्या गुणवत्तेचा आणि दर्जाचा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे रुग्णांनी, ग्राहकांनी सावध रहाण्याची गरज निर्माण झाली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा